Band artists : ‘डीजे बंद करा’ची मागणी; बँड कलाकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Demand to “ban DJs”; band artists protest outside the District Collector’s office : डीजे संस्कृतीविरोधात कलाकार आक्रमक; अनुदान व मानधनासाठी धरणे

Buldhana डीजे संस्कृतीमुळे पारंपरिक बँड कलाकार व वाद्य वाजविणाऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याचा आरोप करत शिवसेना (शिव लहू सेना) संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (दि. २३ मार्च) धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधत विविध मागण्यांसाठी जोरदार एल्गार करण्यात आला.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तांबे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी शिवसेना नेते विजय अंभोरे, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

जिजामाता प्रेक्षागारापासून वाद्यांच्या गजरात मोर्चा काढत कलाकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आंदोलनादरम्यान धार्मिक व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करत कलाकारांनी आपल्या व्यथा मांडल्या.
डीजेच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक बँड पथकांना काम मिळत नसल्याने अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे शासनाने बँड पथकांना किमान १० लाख रुपयांचे अनुदान द्यावे, वृद्ध कलाकारांना लोककलावंताचा दर्जा देऊन मानधन द्यावे, तसेच पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्यांना सन्मान व आर्थिक मदत मिळावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Vijay Wadettiwar : ब्रह्मपुरीतील ६ अल्पवयीन मुलींचे अपहरण; सरकार झोपले आहे का?

याशिवाय बँड वाहनांना आरटीओ व पोलीस प्रशासनाकडून होणारी अडवणूक थांबवावी, तसेच कलाकारांचा सन्मान करण्यासाठी विशेष पुरस्कार योजना सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, “जोपर्यंत लोककलावंतांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात जिल्हाभरातील मोठ्या संख्येने बँड कलाकार सहभागी झाले होते.