Farmers take an extreme step in a land measurement dispute; three consume poison : भूमी अभिलेख कारवाईवर संताप; मारोड शिवारात शेतकऱ्यांची आत्महत्येचा प्रयत्न
Buldhana भूमी अभिलेख विभागाच्या कारवाईदरम्यान संग्रामपूर तालुक्यातील मारोड शिवारात तीन शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, शेतकरी व प्रशासनातील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.
गजानन राजाराम ढोले (वय ६५), विठ्ठल ढोले (६०) आणि रवींद्र ढोले (३५) अशी विषबाधित शेतकऱ्यांची नावे असून ते एकाच कुटुंबातील आहेत. संग्रामपूर तहसील कार्यालयात प्रलंबित असलेल्या जमीन प्रकरणी भूमी अभिलेख विभागाकडून शेत मोजणीसाठी केवळ दोन दिवस आधी नोटीस देण्यात आली होती.
Maharashtra assembly : बुलढाणा नव्हे जिजाऊनगर करा! विधानसभेत मागणी
शेतकऱ्यांनी मोजणीची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. मात्र, ती अमान्य करून भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी व पोलीस पथक मोजणीसाठी शेतात पोहोचल्याने वातावरण तणावपूर्ण झाले.
यामुळे संतप्त झालेल्या गजानन ढोले, विठ्ठल ढोले व रवींद्र ढोले या तिघांनी मोजणी पुढे ढकलण्याची मागणी करत विषारी औषध प्राशन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने तिघांनाही वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी शेगाव येथे हलविण्यात आले.दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.








