uddhav-thackeray-announces-ram-raksha-andolan-over-ram-temple-fund-allegations : ‘राम मंदिराचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, भाजपवर हल्लाबोल
Mumbai: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत ‘रामरक्षा आंदोलन’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत, “राम मंदिराचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे. आता हिंदू माफ करणार नाही,” असे वक्तव्य केले. येत्या रविवारी दुपारी ४ वाजता दादर येथील मारुती मंदिर परिसरातून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचा पाया राम मंदिर आंदोलनात आहे आणि त्या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. राम मंदिराच्या लढ्यात हिंदू समाजाने मोठा त्याग केला, मात्र आज त्याच मंदिराच्या नावाने वेगळेच राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. राम मंदिराचा निधी आणि त्यासंदर्भातील गैरव्यवहाराच्या चर्चांमुळे मंदिराच्या पवित्रतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
Sajid khan pathan : ‘आता फोन नाही, थेट गोळी येईल कथित बिश्नोई गँगचा इशारा, विधानसभेतही प्रश्न गाजला
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विधानाचा संदर्भ देत, “अब हिंदू मार नहीं खायेगा, असे ते म्हणाले होते. आता मी म्हणेन, हिंदू माफ नाही करणार,” असे वक्तव्य केले. या घोषणेसोबतच रामरक्षा आंदोलनाची सुरुवात करण्याचा निर्णय जाहीर करत त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधला.
राम मंदिर आंदोलनाच्या काळातील वातावरणाची आठवण करून देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्या काळात देशभरातील हिंदूंनी आणि शिवसैनिकांनी मोठा संघर्ष केला. गोध्रा, अहमदाबाद दंगल, मुंबई बॉम्बस्फोट यांसारख्या घटनांमध्ये हिंदू समाजाने मोठ्या वेदना सहन केल्या. या भावनांचे राजकीय भांडवल करून भाजपने आपली ताकद वाढवली आणि आज देशात अमर्याद सत्ता उपभोगत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी आमदार आणि खासदारांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरूनही भाजपवर टीका केली. “आमदार-खासदार फोडण्याला ‘ऑपरेशन’ असे नाव दिले जाते. मग आता भाजप ‘ऑपरेशन राम मंदिर’ राबवत आहे का? राम मंदिरावरच दरोडा टाकला जात आहे. काहींच्या मते या कथित चोरीच्या पैशांचा वापर इतर पक्ष फोडण्यासाठी केला जात आहे,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
Women farmers bill : शेतजमीन नसली तरी मिळणार ‘महिला शेतकरी’चा दर्जा
देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी नागरिकांसमोर अनेक प्रश्न उभे असल्याचे सांगितले. राज्य, देश आणि समाज विविध समस्यांनी ग्रासलेला असताना उत्तरदायित्व स्वीकारणारे कोणीच दिसत नसल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे आता प्रश्नांच्या मुळावर प्रहार करण्याची वेळ आली असून राम मंदिराच्या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी आणि कथित गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवण्यासाठी ‘रामरक्षा आंदोलन’ सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून आगामी काळात राम मंदिराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
__








