व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Unseasonal rain : उद्यापासून राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

Unseasonal rain : उद्यापासून राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

maharashtra-weather-update-unseasonal-rain-hailstorm-imd-alert-farmers : वादळी वाऱ्यासह, गारपीटीची शक्यता, शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला

Mumbai : राज्यभरात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ३० मार्चपासून राज्यातील अनेक भागांत आभाळी वातावरणासह दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० मार्च रोजी राज्यातील विविध भागांमध्ये वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून, दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचे सत्र सुरू होऊ शकते. उर्वरित विदर्भातही काही प्रमाणात हवामानात बदल जाणवू शकतो. ३१ मार्च रोजी तुलनेने पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहण्याची शक्यता असली तरी वातावरण पूर्णपणे स्थिर राहणार नाही, असे संकेत देण्यात आले आहेत.

Ashok kharat case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; आर्थिक गैरव्यवहार ईडीची चौकशी!

यापुढे १ ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात पुन्हा वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी आभाळी हवामान, वादळी वारे, मेघगर्जना आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील काही दिवस हवामानातील चढ-उतार कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्यामुळे काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा त्यांना झाकण्याची व्यवस्था करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वादळी वारे आणि संभाव्य गारपीटीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

तसेच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच जनावरांची सुरक्षितता जपावी. अशा वेळी झाडाखाली किंवा टिनशेडखाली उभे राहणे टाळावे तसेच विद्युत उपकरणे, वीज खांब आणि ट्रान्सफॉर्मरपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Vijaypat singhania : रेमंडला जागतिक उंचीवर नेणारे उद्योगपती विजयपत सिंघानिया यांचे निधन

राज्यातील अनेक भागांत सध्या अंशतः आभाळी वातावरण असून पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवत शेतीची कामे नियोजित करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!