chandrashekhar bawankule challanges vijay wadettiwar to Provide evidence : भोंदू खरातवरून बावनकुळेंचे थेट आव्हान, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली
Nagpur भोंदू बाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांनी सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणाला आता तीव्र राजकीय वळण लागले आहे. खरातसोबतचे बड्या नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ रोज समोर येत असतानाच, विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आता पुरावे देण्यावरून जुंपली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात महसूल विभागातील एका बड्या अधिकाऱ्याचा हात असल्याचा दावा केला होता. या दाव्यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवारांना खुले आव्हान देत प्रतिहल्ला चढवला आहे.
माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांच्याकडे जर पक्की माहिती आणि पुरावे असतील, तर त्यांनी ते तातडीने माझ्याकडे द्यावेत. पुरावे मिळताच मी एका झटक्यात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश काढीन. वडेट्टीवारांनी केवळ माध्यमांसमोर भोंगा वाजवून काहीही साध्य होणार नाही. त्यांना खरोखरच या प्रकरणाची सखोल चौकशी हवी असेल, तर त्यांनी ते पुरावे मुख्यमंत्री किंवा तपास यंत्रणांकडे सोपवावेत. केवळ प्रसिद्धीसाठी धक्कादायक वक्तव्ये करणे टाळावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
Buldhana Politics : खामगावातील स्थानिक वाद, महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा ऐरणीवर
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगत बावनकुळे पुढे म्हणाले की, कोणत्याही अधिकाऱ्याच्या कुटुंबाबद्दल किंवा खासगी आयुष्याबद्दल बोलून त्यांची विश्वासार्हता खराब करणे योग्य नाही. वडेट्टीवारांच्या बोलण्यामुळे तपास यंत्रणांवर दबाव येऊ नये, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. ज्या महसूल अधिकाऱ्याचा या प्रकरणात सहभाग आहे, त्याचे नाव आणि पुरावे असलेले पत्र मला आज सायंकाळपर्यंत द्यावे, मी त्याची वाट पाहत आहे. तपास यंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे, विनाकारण शंका उपस्थित करून त्यात व्यत्यय आणू नका, असा सल्लाही त्यांनी माध्यमांना दिला.
ZP elections : निवडणुकीपूर्वी शिवसेनेची मोर्चेबांधणी, ५ एप्रिलला जम्बो प्रवेश!
भोंदू खरातचे पाय धुतानाचे आणि त्याच्या डोक्यावर छत्र धरल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे पडसाद इतके उमटले की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, तसेच त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रदेश उपाध्यक्षपदही काढून घेण्यात आले आहे. बडे राजकीय नेते, अधिकारी आणि गर्भश्रीमंत व्यापारी हे खरातचे क्लायंट असल्याचे समोर आल्याने हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. खरातकडे असलेले अनेक बड्यांचे गुपित पाहता, त्याचा एन्काऊंटर होण्याची शक्यताही आता वर्तवली जात असून संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.








