महसूलमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन, आवश्यक माहिती सादर करण्याचे निर्देश
Ashti : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे अप्पर तालुका निर्माण करण्याच्या मागणीला आता प्रशासकीय स्तरावर गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून, यासंदर्भातील आवश्यक माहिती तत्काळ सादर करण्याचे निर्देश गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आष्टीला अप्पर तालुक्याचा दर्जा मिळावा, या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला नवी आशा निर्माण झाली आहे.
आष्टी तालुका संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, माजी आमदार सुधाकर कोहळे आणि माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने आष्टी येथे अप्पर तालुक्याची निर्मिती करण्याची मागणी सविस्तरपणे मांडली.
अप्पर तालुका निर्मितीसंदर्भात शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात आष्टीचा समावेश नसल्याची बाब शिष्टमंडळाने मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. आष्टीचे भौगोलिक स्थान, प्रशासकीय सुविधा आणि परिसरातील महसुली यंत्रणेची उपलब्धता लक्षात घेता या ठिकाणी अप्पर तालुका निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कौशल्य विकासाच्या कारभारावर भाजपमध्ये खमंग चर्चा! नागपूरचा तो रहस्यमयी नेता नेमका कोण?
आष्टी परिसरात तलाठी साजे आणि दोन महसूल मंडळांची उपलब्धता असून, ग्रामीण रुग्णालयाची सुविधाही आहे. मात्र, महसूल व इतर शासकीय कामांसाठी नागरिकांना दूरवर जावे लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च सहन करावा लागतो. स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध झाल्यास नागरिकांची कामे अधिक सुलभ होतील, तसेच परिसरातील ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळेल, असा मुद्दा शिष्टमंडळाने मांडला.
शिष्टमंडळाच्या मागणीची दखल घेत महसूलमंत्री बावनकुळे यांनी आष्टी येथे अप्पर तालुका निर्माण करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रस्तावाच्या अनुषंगाने आवश्यक भौगोलिक, प्रशासकीय व इतर माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या भेटीदरम्यान आष्टी तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद कोलेट्टीवार, सचिव दिलीप बारसागडे यांच्यासह संजय पंदीलवार, व्यंकटी बुर्ले, दिवाकर कुंदोजवार, शंकर आक्रेड्डीवार, विजय बहिरेवार, बेबी बुरांडे, भारती रायसिडाम, नंदा कुळसंगे, सेवानिवृत्त प्राचार्य दीपक रॉय, डॉ. भारत पांडे, हरिदास मेश्राम, रामचंद्र बामनकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
____








