व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र कालव्याचे पाणी सोडा; अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडणार राष्ट्रवादी शरद पवार गटाचा...

कालव्याचे पाणी सोडा; अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडणार राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा

 

सिंचनाअभावी पिके धोक्यात, हिंगणघाट – समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न ऐरणीवर

 

Hinganghat : समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यांतील अनेक गावांमध्ये कालव्याचे पाणी शेतीसाठी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर सिंचनासाठी पाणी मिळत नसल्यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन कालव्याचे पाणी सोडावे, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी दिला आहे.

समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यांतील विविध गावांमधील शेतकरी कालव्याच्या पाण्याच्या समस्येबाबत वांदिले यांच्याकडे तक्रारी घेऊन येत आहेत. वडगाव धरण प्रकल्पांतर्गत सिंदी (रेल्वे), विखणी, डिग्रज, भोसा, गौळ, पळसगाव, मार्दा, कळमना आणि सालापूर या गावांतील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच वडगाव धरण आणि शेंडेश्वर धरणाच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित वालधूर, सुलतानपूर, कढाजना, उमरी, सातेफळ, पिंपळगाव, कुंभी, येनोरा, रिमडोह, हिंगणघाट, बुरकोनी, चिंचोली, पारडी आणि मानोरा या गावांमध्येही पाण्याची प्रतीक्षा कायम आहे.

लाडकी बहीण योजनेचा बंद केलेला लाभ पूर्ववत करा; जिल्हा काँग्रेसचा सरकारला अल्टिमेटम

 

याशिवाय कोल्ही, चिचघाट, शेंडेश्वर, बेला, तांबारी, कांडली, आजदा आणि शेडगाव येथील शेतकऱ्यांचीही सिंचनासाठी धडपड सुरू आहे. अनेक गावांमध्ये पाण्याची मागणी करूनही अपेक्षित पुरवठा होत नसल्याने शेतीचे नियोजन कोलमडले आहे. सध्या शेतांमध्ये कापूस, तूर आणि हरभरा यांसारखी पिके उभी आहेत. पिकांच्या वाढीसह उत्पादनाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा असताना कालव्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. योग्य वेळी पाणी न मिळाल्यास संपूर्ण हंगामातील मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि ग्रामीण कुटुंबांच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो.

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यांसह जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी अतुल वांदिले यांनी केली. स्थानिक आमदारांनीही या प्रश्नाकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी तातडीने मिळाले नाही, तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्ह्यात आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

_____

 

error: Content is protected !!