Sanjay Nirupam is new sampark pramukh of shivsena nagpur : हक्काच्या मतदारसंघाशी असलेला संघटनात्मक संबंध संपुष्टात
Nagpur मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले माजी खासदार व विद्यमान आमदार कृपाल तुमाने यांचा त्यांच्या हक्काच्या मतदारसंघाशी असलेला संघटनात्मक संबंध आता तोडण्यात आला आहे. त्यांची वर्णी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी नागपूरमध्ये माजी खासदार संजय निरुपम, तर रामटेक लोकसभा मतदारसंघात अनिल कोकीळ यांची संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय निरुपम यांचा एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठा दबदबा होता. त्यावेळीही ते नागपूरचे संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी उत्तर भारतीयांना शिवसेनेशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर निरुपम यांचेही उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले असून, त्यांच्याकडे पुन्हा एकदा नागपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, निरुपम यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातील अनेक पदाधिकारी आता काँग्रेसमध्ये स्थिरावले असल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.
Eknath Shinde Shivsena : शिंदेसेनेत पक्षप्रवेशांची चढाओढ; गायकवाड-जाधव गटात अदृश्य स्पर्धा
दुसरीकडे, रामटेक विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आशिष जयस्वाल करतात. ते अर्थराज्यमंत्र असून गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्रीदेखील आहेत. तुमाने आणि जयस्वाल हे दोन्ही नेते एकाच मतदारसंघातील असल्याने त्यांच्यात प्रदीर्घ काळापासून सुप्त संघर्ष सुरू होता. यामुळे शिवसैनिकही दोन गटांत विभागले गेले होते. भविष्यातील हा वाद टाळण्यासाठी शिंदेसेनेने खबरदारी घेतल्याचे दिसते. म्हणूनच तुमाने यांच्याऐवजी अनिल कोकीळ यांची रामटेक लोकसभा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Electrical distribution transformer : डीपी प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप; शेतकऱ्यांचा प्रशासनावर संताप
याव्यतिरिक्त, विधानसभा निवडणुकीच्या काळात पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख म्हणून माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे प्रभार सोपवण्यात आला होता, आता त्यांची या पदावर नियमित नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांची जबाबदारी डॉ. सावंत यांच्याकडे असेल. तर वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांच्या संपर्कप्रमुख म्हणून आमदार मनीषा कायंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा या पाचही जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख म्हणून नामदार संजय राठोड यांनी आपला प्रभाव कायम राखला आहे.








