protest against administration for bad condition of roads : खड्डेमय रस्त्यांवरून प्रहार आक्रमक; मलकापुरात मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीसमोर अनोखे आंदोलन
Malkapur शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्याकडे नगर परिषद प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘बेशरम’चे झाड देऊन प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप प्रहारकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात अजय टप यांनी ३० जून रोजी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत शहरातील सर्व मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली होती. त्यानंतर १ जुलैपासून नगर परिषद प्रशासनाने काही ठिकाणी मुरूम, खडी आणि चुरी टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. मात्र, हे काम केवळ मोजक्या भागांपुरते मर्यादित राहिल्याचा आरोप टप यांनी केला आहे.
प्रहारच्या म्हणण्यानुसार, शहरातील अनेक प्रमुख रस्ते आणि अंतर्गत मार्ग आजही मोठ्या प्रमाणावर खड्डेमय अवस्थेत असून नागरिक, वाहनचालक आणि रुग्णवाहिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही भागांनाच प्राधान्य देत उर्वरित शहराकडे अन्यायकारक पद्धतीने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यामुळे हे केवळ रस्ते दुरुस्तीचे अपयश नसून नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे आणि उदासीनतेचे उदाहरण असल्याची टीका प्रहारकडून करण्यात आली.
दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी अजय टप आणि प्रहारचे शहर उपाध्यक्ष बलराम बावस्कर नगर परिषद कार्यालयात गेले असता मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘बेशरम’चे झाड अर्पण करत निषेध नोंदविला. या प्रतीकात्मक आंदोलनातून प्रशासनाच्या कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
शहरातील नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त असताना नगर परिषद प्रशासनाला त्याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे, असा आरोप प्रहारकडून करण्यात आला. तातडीने शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास प्रहारच्या वतीने आणखी तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अजय टप यांनी दिला. या आंदोलनामुळे मलकापूर नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता प्रशासन यावर कितपत गांभीर्याने उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.








