व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’ मागे पडले; बुलढाण्यात २० कोटींच्या ‘ऑफर’वरच राजकारण...

Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’ मागे पडले; बुलढाण्यात २० कोटींच्या ‘ऑफर’वरच राजकारण तापले!

Sanjay Raut claims that Dheeraj Lingade was offered ₹20 crore to switch parties : संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याने खळबळ, अनेकांना ऑफर न आल्याचेही दुःख

Buldhana जिल्ह्याच्या राजकारणात सध्या विकास, स्थानिक प्रश्न किंवा पक्षीय संघटनांपेक्षा एका वेगळ्याच मुद्द्याने जोर धरला आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेपेक्षा आता “ऑफर आली का नाही?” हा प्रश्नच राजकीय वर्तुळात अधिक चर्चिला जात आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांना पक्षांतरासाठी तब्बल २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा गंभीर दावा उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आणि त्यानंतर राज्यासह बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय चर्चांना अचानक वेग आला.

या दाव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच आमदार धीरज लिंगाडे यांनी मात्र हा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. आपल्याला अशा प्रकारची कोणतीही ऑफर मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले असून, हा दावा करणाऱ्यांकडेच आता जाब विचारणार, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला केवळ आरोप-प्रत्यारोपांचे स्वरूप न राहता, त्यात राजकीय संदेश, दबाव तंत्र आणि प्रतिमानिर्मितीचा भाग किती आहे, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

DPC akola : जिल्हा नियोजन समितीवर भाजपचे वर्चस्व; बच्चू कडू समर्थकांना पुन्हा डावलले

राजकीय वर्तुळात या प्रकरणाकडे दोन-तीन स्तरांवरून पाहिले जात आहे. एकीकडे, जर खरोखरच अशी ऑफर दिली गेली असेल तर तो लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर विषय ठरू शकतो. पक्षांतरासाठी कोट्यवधींची बोली लागतेय, असा संदेश गेला तर तो राज्याच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे. दुसरीकडे, जर अशी कोणतीही ऑफरच आली नसेल, तर एवढा मोठा दावा नेमका कोणत्या राजकीय हेतूने करण्यात आला, हा सवालही उपस्थित केला जात आहे.

Road accidents : बाळापूरमधील रस्त्यांची दुरवस्था; ७ वर्षांत ८५१ अपघात, ३३४ जणांचा मृत्यू

याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांमध्येही मिश्कील प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. “२० कोटींची ऑफर नेमकी कुठे फिरतेय, आम्हालाही दाखवा,” अशा टोमण्यांतून या चर्चेची खिल्ली उडवली जात असली, तरी या विषयाने राजकीय पातळीवर निर्माण केलेले पडसाद दुर्लक्षित करता येणार नाहीत.

राजकीय जाणकारांच्या मते, हे प्रकरण केवळ एका आमदारापुरते मर्यादित नसून, राज्यातील सध्याच्या सत्तासमीकरणांचे, विरोधकांच्या रणनीतीचे आणि आगामी राजकीय हालचालींचे संकेत देणारे ठरू शकते. त्यामुळे आता या दाव्याचा शेवट खुलासा, पुरावे, खंडन की नव्या आरोपांमध्ये होतो, याकडे बुलढाण्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!