व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sunetra pawar : राष्ट्रवादीत नवा राजकीय पेच; सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे पार्थ पवार...

Sunetra pawar : राष्ट्रवादीत नवा राजकीय पेच; सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत !

ncp-sunetra-pawar-letter-election-commission-parth-pawar-controversy : निवडणूक आयोगाकडे पाठवलेले पत्र मागे घेण्याची चर्चा

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींना नवा कलाटणी देणारी घटना समोर आली असून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पक्षात राजकीय पेच निर्माण झाला आहे. या पत्रामुळे पार्थ पवार यांच्यासह पक्षातील काही महत्त्वाच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आता हे पत्र मागे घेण्याची हालचाल सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून २८ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत झालेला सर्व पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केली होती. मात्र या निर्णयाचे दूरगामी परिणाम लक्षात आल्यानंतर आता हेच पत्र मागे घेण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

या पत्रामुळे १६ फेब्रुवारी रोजी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्रही रद्द ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती. याच पत्राच्या आधारे पार्थ पवार यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती तसेच एबी फॉर्मवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या पत्रानुसार तो कालावधीच अमान्य ठरवला गेला तर पार्थ पवार यांच्या उमेदवारीसह संबंधित कागदपत्रांवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

Rahul Bondre : काँग्रेस माझ्या रक्तात आहे, पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही

दरम्यान, या कालावधीत पक्षातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती तसेच सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड यांचा समावेश होता. या सर्व निर्णयांची नोंद असलेले कार्यकारिणीचे मिनिट्स देखील निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले होते. त्यामुळे हा संपूर्ण कालावधीच अमान्य ठरल्यास पक्षाच्या अंतर्गत रचनेवर आणि निर्णय प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी हे पत्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत न करता पाठवले होते. या निर्णयामागे पार्थ पवार यांची भूमिका असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र या पत्रामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात आल्यानंतर काही नेत्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.

Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांचा लोणारकडे मोर्चा, खासदारकीसाठी मोर्चेबांधणीची तयारी?

या पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार लवकरच निवडणूक आयोगाकडे पुन्हा पत्र पाठवून आधीचे पत्र निरस्त करण्याची विनंती करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणावरही या घडामोडींचा परिणाम होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. या सर्व घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून आला असून पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!