व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Devendra Fadnavis : ‘मी परवाच दिल्लीत जाऊन आलो…’; देवेंद्र फडणवीसांनी एकाच वाक्यात...

Devendra Fadnavis : ‘मी परवाच दिल्लीत जाऊन आलो…’; देवेंद्र फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला

Devendra Fadnavis puts an end to the ongoing political speculation over a leadership change in the state : राज्यातील नेतृत्वबदलाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना दिला पूर्णविराम

Nagpur मी परवाच दिल्लीला जाऊन आलो, असे थेट सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दिल्लीवारीबाबत आणि राज्यातील नेतृत्वबदलाबाबत सुरू असलेल्या सर्व राजकीय चर्चांना एका झटक्यात पूर्णविराम दिला.

पावसाळी अधिवेशन आटोपताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असे असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्री होणार नाहीत असा दावा करत राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फोडले होते. मात्र, नागपुरात माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी केवळ एका वाक्यात उत्तर देत सर्व विरोधकांची तोंडे बंद केली.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला होता की, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याचे मला समजले आहे. मात्र काहीही झाले तरी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत.

Eknath Shinde : ‘जो रामाचा नाही, तो कामाचा नाही’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला

भाजप राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री करणार आहे. त्यामुळे शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहू नयेत, कारण त्यांची प्रतिमा खराब झाली आहे. पुढे बोलताना राऊत यांनी फडणवीस दिल्लीला गेले आणि पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंदच आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. तसेही ते महाराष्ट्रात राहून आता काय करणार? २०२९ मध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणारच नाही असा टोला त्यांनी लगावला.

संजय राऊत यांच्या याच विधानाचा धागा पकडत आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात आपली प्रतिक्रिया दिली. बच्चू कडू यांनी राऊत यांचा दावा फेटाळून लावताना म्हटले, संजय राऊत यांची आजवर एकही राजकीय भविष्यवाणी खरी ठरलेली नाही. आता त्यांनी कोणत्या ज्योतिषाला हात दाखवला हे मला ठाऊक नाही. त्यांनी एकनाथ शिंदेंचे भविष्य पाहिले की स्वतःचे, हेही माहीत नाही. त्यामुळे त्यांच्या या भाकिताला काही अर्थ नाही. सोबतच त्यांनी देवाभाऊंनी दिल्लीची तयारी करावी आणि महाराष्ट्राची सूत्रे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी आपल्या हाती घ्यावीत अशी इच्छा व्यक्त केली.

योगायोगाने देवेंद्र फडणवीस हेदेखील आज नागपूर दौऱ्यावर होते. जेव्हा माध्यम प्रतिनिधींनी त्यांना संजय राऊत यांच्या या राजकीय भाकितावर आणि बच्चू कडू यांच्या इच्छेवर प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी मी परवाच दिल्लीला जाऊन आलो, एवढेच म्हणत या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकला.

Rising debt revenue : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला ‘कॅग’चा इशारा!

विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, त्यांच्यावर भाजप केंद्रीय पातळीवर मोठी जबाबदारी सोपवणार आणि ते पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार आहेत, असे दावे राजकीय वर्तुळात सातत्याने केले जात आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच २०२९ पर्यंत मी कुठेही जाणार नाही आणि महाराष्ट्रातच राहणार, असे स्पष्ट करत हे सर्व दावे खोडून काढले आहेत. आज नागपुरात दिलेल्या त्यांच्या संक्षिप्त उत्तराने या चर्चांवर पुन्हा एकदा तात्पुरती खिळ बसली आहे.

error: Content is protected !!