व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Malkapur municipal council : कुरघोडीच्या राजकारणात काँग्रेसचे संघटन विस्कळीत

Malkapur municipal council : कुरघोडीच्या राजकारणात काँग्रेसचे संघटन विस्कळीत

Factional politics leaves the Congress organization in disarray : मलकापुरात सत्ता असूनही गटबाजीमुळे प्रश्न कायम

Malkapur नगरपालिकेतील सत्तास्थानी असलेला काँग्रेस पक्ष सध्या अंतर्गत खेकडा वृत्ती, गटबाजी आणि कुरघोड्यांच्या राजकारणात इतका गुरफटला आहे की, सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निष्ठेपेक्षा स्वार्थ, संघटनेपेक्षा गट आणि विचारांपेक्षा व्यक्ती महत्त्वाच्या ठरत असल्याने मलकापूर काँग्रेसमध्ये नेमके चाललेय तरी काय? हा प्रश्न आता उघडपणे उपस्थित केला जात आहे.

सध्या मलकापूर काँग्रेसमध्ये “जो वर जाईल, त्याला खाली ओढा” हीच जणू अनौपचारिक नीती बनली आहे. एखादा नेता किंवा कार्यकर्ता पुढे सरसावला की, त्याच्या पायात अडथळे आणण्याची स्पर्धाच सुरू होते. ही खेकडा वृत्ती आता अपवाद न राहता पक्षाची ओळख बनत चालली आहे. परिणामी, नेतृत्व उभे राहण्याआधीच त्याला खिळ बसवली जात असून, संघटनात्मक बळ दिवसेंदिवस कमकुवत होत आहे.

water crisis : १४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, भरउन्हात नागरिकांची भटकंती

पक्षातील गटबाजी इतकी तीव्र झाली आहे की, काँग्रेस आता एकसंध संघटना कमी आणि गटांचा समूह अधिक वाटू लागली आहे. प्रत्येक गट स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी झटताना दिसतो. निर्णय प्रक्रियेत एकवाक्यता नसून संघर्षाचेच चित्र दिसते. एखाद्या निर्णयामागे धोरणापेक्षा “कोणाचा प्रभाव वाढेल आणि कोणाचा कमी होईल?” हा राजकीय हिशेब अधिक महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे निर्णय हे पक्षाच्या भल्यासाठी नव्हे, तर विशिष्ट गटाच्या फायद्यासाठी घेतले जात असल्याची चर्चा आहे.

“आपला” आणि “परका” ही विभागणी तर इतकी ठळक झाली आहे की, निष्ठा आणि कार्याचा विचार दुय्यम ठरू लागला आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणारे कार्यकर्ते एका बाजूला पडले आहेत, तर अचानक आलेले नवखे चेहरे थेट सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचत आहेत. आयाराम संस्कृतीने काँग्रेसमध्ये इतके खोलवर पाय रोवले आहेत की, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वासच डळमळीत झाल्याचे चित्र आहे.

जुन्या नेतृत्वाची स्थितीदेखील वेगळी नाही. जे कधी पक्षाचे आधारस्तंभ होते, त्यांची पकड आता सैल झाल्याचे दिसते. त्यांच्या अनुभवाला आणि मार्गदर्शनाला दुय्यम स्थान दिले जात आहे. दुसरीकडे नव्या नेतृत्वात आक्रमकता असली, तरी स्थैर्य आणि दूरदृष्टीचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. “नवा गडी, नवा राज” या मानसिकतेतून काम करताना पक्षातील संतुलन पूर्णपणे बिघडले आहे.

Farmers loan waiver : कर्जमाफीच्या प्रक्रियेत अडकले नवे कर्ज, वाटपावर होणार परिणाम

वरिष्ठ नेतृत्वाची भूमिकादेखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. संयमाच्या नावाखाली स्वीकारलेली निष्क्रिय भूमिका गटबाजीला खतपाणी घालत असल्याची टीका उघडपणे होत आहे. ज्या ठिकाणी निर्णय घेऊन संघटनेला एकत्र ठेवण्याची गरज होती, तेथे शांततेचा मार्ग स्वीकारल्याने परिस्थिती आणखी चिघळल्याचे बोलले जात आहे.

या सगळ्याचा सर्वात गंभीर परिणाम म्हणजे शहराच्या विकासाचा बट्ट्याबोळ होत आहे. गटबाजीच्या अखंड संघर्षात शहराचा विकास पूर्णपणे मागे पडला आहे. निर्णय घेताना शहराच्या गरजांपेक्षा गटाच्या समीकरणांना प्राधान्य दिले जात असल्याने अनेक योजना रखडत आहेत, कामे अर्धवट राहत आहेत आणि नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

error: Content is protected !!