व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay raut : “फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केली” राऊतांचा घणाघात

Sanjay raut : “फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केली” राऊतांचा घणाघात

sanjay-raut-on-eknath-shinde-operation-tiger-devendra-fadnavis-criticism : ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर ठाकरे गटाचा पलटवार

Mumbai : राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटातील खासदार फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यामागून या हालचालींसाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चांना उत्तर देताना राऊत यांनी ही सर्व माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला आहे.

ठाण्यात बुधवारी रात्री शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदारांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. या बैठकीला ९ पैकी ८ खासदार उपस्थित असल्याचे सांगितले जात होते. मात्र, या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी या चर्चांना फेटाळून लावत उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली.

राऊत म्हणाले की, “ऑपरेशन एकदाच होतं, वारंवार ऑपरेशन केलं जात असेल तर ते डेडबॉडीचं ऑपरेशन असतं. सध्या जे काही सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर करत आहेत. फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केली आहे.” असे वक्तव्य करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी पुढे सांगितले की, शिवसेनेचे सर्व नऊ खासदार एकजुटीने पक्षासोबत आहेत आणि त्यांच्या फुटीच्या बातम्या हास्यास्पद आहेत.

Balwant Wankhede : खूप झाल्या बैठका, आता कामाला लागा, खासदाराचा अल्टीमेटम

या चर्चांवर बोलताना राऊत यांनी काही माध्यमांमधून जाणीवपूर्वक अशा बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोपही केला. “आज काही नावं घेतली जात आहेत, उद्या माझं नाव किंवा आदित्य ठाकरे यांचं नाव टाकलं जाईल. वातावरण गरम ठेवण्यासाठी किंवा काहीतरी हालचाल सुरू असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी या बातम्या पसरवल्या जात आहेत,” असे ते म्हणाले.

दरम्यान, निधी वाटपाच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी सरकारवर टीका केली. विरोधी पक्षाच्या खासदारांना विकास निधी दिला जात नसल्याचा आरोप करत त्यांनी, “हे पैसे तुमच्या बापाच्या खिशातले आहेत का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. लाखो मतदारांनी निवडून दिलेल्या खासदारांना निधीपासून वंचित ठेवणे हा सामाजिक आणि राजकीय अन्याय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देताना राऊत म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांनी संकुचित राजकारण सोडून सर्व पक्षांना समान न्याय देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. अन्यथा त्यांचे राजकीय अस्तित्व केंद्रातील नेतृत्वावरच अवलंबून राहील, अशी टीका त्यांनी केली.

Operation tiger : ठाण्यात शिंदे-ठाकरे गटातील गुप्त बैठकीची चर्चा !

एकूणच, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुढील काही दिवसांत या घडामोडींना कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!