Sudhir Mungantiwar’s ‘mega recruitment drive’ rattles Jorgewars; party workers target MLA directly : कार्यकर्त्याने किशोर जोरगेवार यांची ‘कुंडली’ चव्हाट्यावर आणली
Chandrapur : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनी चंद्रपुरात राजकीय संघर्षाचा मोठा भडका उडाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली तब्बल सोळाशे कार्यकर्त्यांनी एकाच वेळी भाजपमध्ये प्रवेश करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला असताना, या ‘मेगा भरती’मुळे स्वपक्षाचेच आमदार किशोर जोरगेवार यांचे धाबे दणाणले आहेत. या पक्षप्रवेशाला ‘गुन्हेगारांची भरती’ संबोधून जोरगेवारांनी आपल्याच पक्षावर तोफ डागली, मात्र हा डाव त्यांच्यावरच उलटला असून संतापलेल्या कार्यकर्त्यांनी आता थेट किशोर जोरगेवार यांची ‘कुंडली’ चव्हाट्यावर आणली आहे.
भाजपच्या या अंतर्गत वादामुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून पक्षातील अंतर्गत कलह सातत्याने उफाळून येत आहे. जोरगेवारांची एकाधिकारशाही आणि पक्षादेश झुगारून घेण्याच्या वृत्तीमुळे भाजपवर यापूर्वी महापालिका गमावण्याची वेळ आली होती. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेली उमेदवारांची अधिकृत यादी बदलण्याचे धाडस जोरगेवार आणि त्यांच्या समर्थकांनी केले होते, ज्यामुळे जिल्हाध्यक्षांची हकालपट्टी झाली आणि एबी फॉर्मच्या चोराचोरीमुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मुनगंटीवारांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता, तर भाजपला आपला महापौरही बसवता आला नसता, अशा भावना कार्यकर्त्यांमध्ये आहेत. तरीही जोरगेवारांनी पडद्यामागून पक्षविरोधी कारवाया सुरूच ठेवल्याचा आरोप होत आहे.
स्थापना दिनाच्या मुहूर्तावर झालेल्या भव्य पक्षप्रवेशानंतर जोरगेवारांनी केलेल्या विधानामुळे नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापूर्वी आमदारांनी स्वतःचे चारित्र्य तपासावे, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी त्यांना सुनावले आहे. जोरगेवारांनी विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या शपथपत्रात स्वतःवर फसवणूक आणि मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याचे मान्य केले आहे, याची आठवण आता करून दिली जात आहे. माजी नगरसेवक अजय सरकार यांनी तर थेट आव्हान देत म्हटले की, मी जेव्हा जोरगेवारांसोबत होतो तेव्हा मी गुन्हेगार नव्हतो का? माझ्याकडे आमदारांची सर्व कुंडली आहे. त्यांनी २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन देऊन जनतेची फसवणूक केली आहे. हिंमत असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
खुल्या व्यासपीठावर पक्षाची शिस्त मोडणाऱ्या आणि ध्येयधोरणांना आव्हान देणाऱ्या जोरगेवारांवर पक्षश्रेष्ठी कारवाई का करत नाहीत, असा सवाल आता सामान्य कार्यकर्ता विचारत आहे. एकीकडे मुनगंटीवारांच्या नेतृत्वात पक्ष संघटना मजबूत होत असताना, दुसरीकडे स्वतःचेच आमदार अडथळे निर्माण करत असल्याने चंद्रपूर भाजपमधील हा गृहकलह आता कोणत्या वळणावर जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आमदारांच्या विरोधातील गुन्ह्यांची यादी सार्वजनिक करण्याच्या इशाऱ्यामुळे सध्या तरी आमदार जोरगेवारांवर तोंड लपवण्याची पाळी आली आहे.








