दीड वर्षांपासून बांधकाम रखडल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर; राजकमल चौकात शासन-प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
Amravati : शहरातील रेल्वे स्टेशन चौक ते राजकमल चौकादरम्यानच्या महत्त्वपूर्ण उड्डाणपुलाचे बांधकाम मागील दीड ते दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने राजकमल चौक परिसरात मशाल आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष बबलू ऊर्फ नितिराज शेखावत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ऑगस्ट २०२५ पासून पूल वाहतुकीसाठी बंद
शहराच्या मध्यवर्ती भागांना जोडणारा हा उड्डाणपूल जीर्ण झाल्याने ऑगस्ट २०२५ पासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी १२५ ते १३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काही दिवस काम सुरू केल्यानंतर पुन्हा तांत्रिक कारणे पुढे करून ते बंद ठेवले जाते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने अमरावतीकरांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
खासदार वानखडे आक्रमक; मेळघाटातील वीज प्रकल्पाविरोधात आरपारच्या लढाईचा इशारा
वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
उड्डाणपूल बंद असल्याने पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे. राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक आणि रेल्वे स्थानक परिसरात दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या वाहतूक कोंडीचा फटका स्थानिक व्यापाऱ्यांनाही बसत असून, त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णवाहिकांनाही वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हातात पेटत्या मशाली घेऊन शासन आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात माजी मंत्री सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, भैय्या पवार यांच्यासह शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
दुष्काळानंतर जाग आली; कायमस्वरूपी उपायांसाठी ‘पूल तिथे बंधारा’!
काम पूर्ण करण्याची डेडलाईन जाहीर करा
यावेळी काँग्रेस नेत्यांनी प्रशासनाला सज्जड इशारा दिला. उड्डाणपुलाच्या कामाची सद्यस्थिती काय आहे, मंजूर निधीचा विनियोग कसा झाला आणि बांधकाम नेमके कधी पूर्ण होणार, याची माहिती प्रशासनाने द्यावी. तसेच काम पूर्ण करण्याची निश्चित कालमर्यादा (डेडलाईन) लेखी स्वरूपात जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.
उड्डाणपुलाचे उर्वरित बांधकाम युद्धपातळीवर सुरू करून नागरिकांना दिलासा न दिल्यास आगामी काळात ‘अमरावती बंद’सारखे तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.








