MSP procurement stalled due to shortage of gunny bags : बारदान्याअभावी हमीभाव खरेदी ठप्प; उद्धवसेना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Buldhana बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रांवरील शेतमाल खरेदी बंद ठेवण्यात आल्याचा आरोप उध्दव सेनेने केला आहे. शेतमाल खरेदी प्रक्रियेत वारंवार अडथळे निर्माण करून व्यापाऱ्यांचे हित जपले जात असल्याचा आरोप उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केला.
हमीभाव केंद्रांवरील खरेदी बंद असल्याने उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने खरेदी सुरू करण्याची मागणी केली.
Nashik it case : कॉर्पोरेट व्यवस्थेतील धोका, नाशिक आयटी प्रकरणातून उघड
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन, हरभरा, मका यांसारखा शेतमाल मोठ्या प्रमाणावर पडून असताना केवळ बारदान्याचा तुटवडा दाखवून खरेदी केंद्रे बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यापूर्वी उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत खरेदी थांबवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा केंद्रे सुरू करण्यात आली; मात्र आता पुन्हा बारदाना नसल्याचे कारण पुढे करत जिल्ह्यातील सुमारे ४० खरेदी केंद्रे गेल्या महिनाभरापासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकारामुळे शेतकऱ्यांना कमी भावाने व्यापाऱ्यांना माल विकण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. यामागे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करत व्यापाऱ्यांकडून शेतमाल खरेदी करून तो नाफेडला शेतकऱ्यांच्या नावाने विकला जात असल्याचे प्रकार घडत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उद्धवसेनेने केली आहे.
Nashik crime : नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतर प्रकरणाला भीषण वळण !
सरकारने तातडीने सर्व खरेदी केंद्रे पूर्ववत सुरू करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कहार्हाडे, मोताळा तालुकाप्रमुख विजय इंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बारदाना उपलब्ध नसल्याने हमीभाव केंद्रांवरील खरेदी बंद ठेवणे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची टीका राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.








