allegation war between Navneet Rana and Pyare Khan in the sexual exploitation case : प्यारे खान यांनी महिलांची माफी मागावी, राणांचे आवाहन
Amravati अचलपूर प्रकरणात लॅपटॉप जप्त झाल्यानंतरच राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्याशी संवाद साधेन, असा इशारा माजी खासदार नवनीत राणा यांनी दिला. संबंधित प्रकरणात काही अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर येत असून, घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणातील मुख्य आरोपीला त्याच्या वडिलांचे प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करत, आरोपीच्या वडिलांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी राणा यांनी केली. परिसरातून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे वडील आक्षेपार्ह विधान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लॅपटॉप जप्त झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड होईल, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी तत्काळ राजीनामा देऊन समाजाच्या वतीने महिलांची माफी मागावी, अशी मागणीही राणा यांनी केली. अचलपूरमधील घटनेबाबत त्यांनी संताप व्यक्त करत, यापूर्वी घडलेल्या काही घटनांवरही प्रश्न उपस्थित केले.
नाशिकमधील अत्याचाराच्या घटनांपासून ते अमरावतीतील उमेश कोल्हे हत्याकांडापर्यंत विविध प्रकरणांवर प्रतिक्रिया देताना संबंधित पदाधिकाऱ्यांची भूमिका काय होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
हिंदू मुलींना फसवण्याच्या घटनांबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे सांगत, अशा प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी राणा यांनी केली. संबंधित मुद्द्यांवर प्यारे खान यांनी प्रथम भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतरच पुढील प्रतिक्रिया दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.







