व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nagpur congress : जिचकारांचे नाव पुढे करताच काँग्रेसचा एमआयएमला ‘दे धक्का’; आसीनगर...

Nagpur congress : जिचकारांचे नाव पुढे करताच काँग्रेसचा एमआयएमला ‘दे धक्का’; आसीनगर झोन सभापती निवडणुकीत केला गेम

Congress plays a cautious move in Asinagar Zone Chairman election : आसीनगर झोन सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध खेळी

Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठे घमासान सुरू असून आसीनगर झोन सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसने अत्यंत सावध खेळी करत एमआयएम आणि मुस्लिम लीग आघाडीला धोबीपछाड दिली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे कट्टर विरोधक नरेंद्र जिचकार यांना स्वीकृत सदस्य करण्यासाठी एमआयएमने घातलेला घाट त्यांच्याच अंगलट आला असून, या राजकीय मैत्रीची मोठी किंमत एमआयएमला झोन सभापतीपद गमावून चुकवावी लागली आहे.

आसीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये एमआयएम आणि काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या झोनवर एमआयएमचा सभापती विराजमान होईल, असे चित्र सुरुवातीला दिसत होते. मात्र, एमआयएमने काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षात उडी घेत विकास ठाकरे यांचे विरोधक नरेंद्र जिचकार यांचे नाव स्वीकृत सदस्यासाठी पुढे केले. ही बाब काँग्रेसच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी एमआयएमला धडा शिकवण्याचा निर्धार केला. काँग्रेसने रणनीती आखत बसपाच्या एकमेव नगरसेवकाला आपल्या बाजूने वळवून घेतले आणि एमआयएमच्या गोटात मोठी खळबळ उडवून दिली.

Nagpur congress conflicts : काँग्रेसचा ‘हात’ पुन्हा वादात! स्वीकृत सदस्यावरून ठाकरे-राऊत गट भिडले; प्रदेशाध्यक्षांच्या ‘त्या’ पत्रावरून सस्पेन्स वाढला

या निवडणुकीत विशेष चर्चा होती ती एमआयएमच्या नगरसेविका अलीशा फहीम खान यांची. औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात निर्माण झालेल्या तणावाप्रकरणी संशयित आरोपी फहीम खान यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता व प्रशासनाने त्यांचे घरही पाडले होते. याच फहीम खान यांच्या पत्नी अलीशा खान यांना एमआयएमने उमेदवारी दिली होती आणि त्या निवडूनही आल्या होत्या. फहीम खान यांच्यावर भाजपने अन्याय केल्याचा दावा करत अलीशा खान यांना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन एमआयएमने काँग्रेस आणि बसपाला केले होते. मात्र, काँग्रेसने या भावनिक आवाहनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

Nagpur municipal corporation : नागपूर महापालिकेत भाजपचे पुन्हा ‘महिला कार्ड’; ८ झोनमध्येही ‘मातृशक्तीला वंदन’

काँग्रेसने या भागातील मुस्लिमांची लोकसंख्या आणि राजकीय गणिते लक्षात घेऊन आसिफ शेख यांचे नाव सभापतीपदासाठी समोर केले. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी बसपाच्या नगरसेवकाची साथ मिळाल्याने काँग्रेसचे पारडे जड झाले आणि एमआयएमच्या उमेदवार अलीशा फहीम खान यांचा अवघ्या एका मताने धक्कादायक पराभव झाला. जिचकारांच्या समर्थनासाठी काँग्रेसची नाराजी ओढवून घेणे एमआयएमला चांगलेच महागात पडले असून, आसीनगर झोनमधील या निकालाने नागपूरच्या राजकारणात काँग्रेसने आपला वरचष्मा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

error: Content is protected !!