Congress leader has criticized that women are being blatantly misled in the name of delimitation : फेररचनेच्या नावाखाली महिलांची ही शुद्ध धूळफेक, काँग्रेस नेत्याची टीका
Nagpur भारतीय जनता पक्षाचा इतिहास हा महिला आरक्षणाला विरोध करण्याचा राहिला आहे. आता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे विधेयक आणले गेले आहे. फेररचनेच्या नावाखाली महिलांची ही शुद्ध धूळफेक असून संविधानावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे, अशा शब्दांत काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर नागपुरात जोरदार हल्ला चढवला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेव्हा काँग्रेसने महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले, तेव्हा भाजपनेच त्याला विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षणाचे विधेयक आधीच मंजूर झाले आहे. त्यास काँग्रेसने समर्थन दिले आहे, एवढेच. एवढेच नवे तर बिलाच्या बाजूने मतदान केले आहे. या बिलानुसार आजपासून तत्काळ महिलांना आरक्षण देता येते असे त्यांनी सांगितले. पण सरकारला ते लागू केव्हा करायचे याचा निर्णय घ्यायचा नाहीये. नव्या विधेयकात ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणाचा कोणताही उल्लेख नाही, म्हणूनच काँग्रेसचा याला विरोध आहे.
देशाच्या राजकीय रचनेवर भाष्य करताना त्यांनी दक्षिण आणि उत्तर भारताच्या वादाकडे लक्ष वेधले. लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना करणे म्हणजे दक्षिण भारतावर अन्याय आहे. दक्षिण भारतातील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रित ठेवली, ही त्यांची चूक आहे का? नव्या रचनेमुळे सत्तेचे केंद्र पूर्णपणे उत्तर भारताकडे जाईल आणि दक्षिण भारताचा वाटा कमी होईल. सत्तेच्या हव्यासापोटी भाजप देशाला विभाजनाच्या उंबरठ्यावर नेत आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजपच्या मानसिकतेवर टीका करताना वडेट्टीवार यांनी हाथरस आणि मणिपूरमधील अत्याचारांचा दाखला दिला. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आणि आसाराम बापूंसारख्या गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्यांनी आम्हाला महिला सन्मान शिकवू नये. देशात पहिली महिला पंतप्रधान, पहिली महिला राष्ट्रपती आणि राज्यपाल काँग्रेसनेच दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ दिल्लीच्या इशाऱ्यावर नाचत असून, त्यांची स्वतःची भूमिका दिल्लीच्या आदेशावरून वारंवार बदलत असते, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘काँग्रेस मुक्त भारत’च्या घोषणेचा समाचार घेताना वडेट्टीवार ठणकावून म्हणाले की, भाजपच्या १७ पिढ्या आल्या तरी काँग्रेस मुक्त भारत होऊ शकणार नाही. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ५८ वेळा काँग्रेसचे नाव घेतले, यातच त्यांची भीती दिसून येते. भाजपने जनगणना आणि परिसिमनाचा जो घोळ घातला आहे, त्याविरोधात काँग्रेस आता रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा या वेळी वडेट्टीवार यांनी दिला. पत्रकार परिषदेला आमदार विकास ठाकरे, अतुल कोटेचा आदी उपस्थित होते.








