anna-hazare-demand-law-against-defection-aap-split-raghav-chadha-bjp : पक्षांतरावर संताप; ‘आप’मधील मोठ्या फुटीनंतर राजकीय खळबळ
Mumbai : देशात वाढत्या पक्षांतराच्या प्रवृत्तीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र संताप व्यक्त करत संसदेत कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे. सत्ता आणि पैशाच्या लालसेपोटी नेते पक्ष बदलत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ठोस कायदेशीर यंत्रणा उभारणे गरजेचे असल्याचे ठामपणे सांगितले.
अण्णा हजारे म्हणाले की, पक्ष टिकण्यासाठी आणि लोकशाहीची शुचिता राखण्यासाठी पक्षांतरावर निर्बंध असणे अत्यावश्यक आहे. मनमानी पद्धतीने नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात, हे लोकशाहीसाठी घातक आहे. सत्ता आणि पैशाच्या मोहामुळे आज राजकारणाचे स्वरूप बदलले असून समाज आणि देश दुय्यम ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली. नागरिकांनी मतदान करताना चारित्र्यसंपन्न उमेदवारांची निवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
आंदोलनातून उभ्या राहिलेल्या पक्षांमध्येही आज फूट पडताना दिसत आहे, ही चिंताजनक बाब असल्याचे सांगत अण्णा हजारे यांनी स्वार्थामुळे नेते पक्ष सोडत असल्याचे नमूद केले. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रात राजकारण अडकले असून यामुळे लोकशाही कमकुवत होत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
Devendra fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्ट भूमिका; वाद नको पण मराठीला प्राधान्य आवश्यक!
दरम्यान, या प्रतिक्रियेची पार्श्वभूमी म्हणजे आम आदमी पक्ष मधील मोठी फूट. पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या सोबत आणखी सात खासदारांनीही पक्ष सोडला आहे. या घडामोडीमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषदेत आपला निर्णय जाहीर करत राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण होत असल्याचा दावा केला. या घडामोडीनंतर पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली असून पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे मानले जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये स्वाती मालीवाल, अशोक कुमार मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, बलबीर सिंग सीचेवाल आणि विक्रमजीत सिंग साहनी यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांनी आम आदमी पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. काही दिवसांपासून पक्षात मतभेद सुरू असल्याच्या चर्चा होत्या, त्यानंतर या फुटीने त्या चर्चांना पुष्टी मिळाली आहे.
.
या संपूर्ण घडामोडींमुळे एकीकडे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असताना दुसरीकडे अण्णा हजारेंनी उपस्थित केलेला पक्षांतरावरील कायद्याचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.








