vidhan-parishad-election-shivsena-eknath-shinde-neelam-gorhe-bacchu-kadu : एकनाथ शिंदे यांची रणनीती शिलेदार निवडले पण…
Mumbai : महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून शिवसेनेतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाकडून विधानपरिषदेसाठी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे पुढे केली असल्याची चर्चा असतानाच या दोन्ही उमेदवारांना पक्षाच्या आतूनच मोठा विरोध होत असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील विधानपरिषदेच्या एकूण नऊ जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांनंतर आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेनेकडे विधानसभेत 57 आमदारांचे संख्याबळ असल्यामुळे दोन जागा सहज जिंकण्याची शक्यता मानली जात आहे. विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो, त्यामुळे गणिताच्या दृष्टीने शिवसेना मजबूत स्थितीत असली तरी उमेदवारीवरून पक्षांतर्गत संघर्ष वाढताना दिसत आहे.
Farmer loan waiver : ३५ लाख शेतकऱ्यांना दिलासा? दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची शक्यता!
सूत्रांच्या माहितीनुसार, नीलम गोऱ्हे यांच्या उमेदवारीला काही मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांचा विरोध आहे. राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेतही नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी पक्षातील एका गटाकडून जोर धरत आहे. त्यामुळे जुन्या नेतृत्वाला पुन्हा संधी देण्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे बच्चू कडू यांच्या उमेदवारीवरून अधिकच वाद निर्माण झाला आहे. बच्चू कडू यांचा शिवसेनेशी थेट संबंध नसताना त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय योग्य नसल्याचे मत अनेक नेत्यांनी मांडले आहे.
याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्यासमोर महत्त्वाची अट ठेवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यांच्या प्रहार संघटनेचे शिवसेनेत विलीनीकरण केल्यासच त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे. मात्र या विषयावर अद्याप कोणतीही ठोस चर्चा झालेली नसल्याचे समजते. त्यामुळे पुढील दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी पक्षात मोठे राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का; अपात्र लाभार्थींवर थेट कारवाई!
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिसूचना 23 एप्रिल रोजी जारी करण्यात आली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल आहे. अर्जांची छाननी 2 मे रोजी होणार असून 4 मे ही माघारीची अंतिम तारीख आहे. 12 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 13 मेपर्यंत पूर्ण होणार आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना कोणाला अंतिम उमेदवारी देते आणि अंतर्गत विरोध कसा हाताळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
___








