ladki-bahin-yojana-ineligible-beneficiaries-recovery-maharashtra : कोट्यवधींची वसुली, हजारो अपात्र महिलांची नावे यादीत
Mumbai : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना अंतर्गत अपात्र लाभार्थींवर मोठी कारवाई सुरू झाली असून हजारो महिलांकडून घेतलेले पैसे परत वसूल करण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. या निर्णयामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मानधन दिले जाते. मात्र, यासाठी शासनाने काही स्पष्ट निकष आणि अटी निश्चित केल्या होत्या. त्या अटींचे उल्लंघन करत अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण १२,९१५ लाभार्थी अपात्र आढळून आले असून त्यापैकी ६,४५७ महिलांकडून आतापर्यंत सुमारे ११ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थींमधूनही वसुलीची प्रक्रिया सुरू असून शासन या प्रकरणात कठोर भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांमध्ये २,६५२ महिला या शासकीय कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे. नियमांनुसार शासकीय सेवेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेण्यास मनाई असताना देखील त्यांनी अर्ज करून सुमारे ३ कोटी ५८ लाख रुपयांचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात काहींनी १८ ते २१ हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याची माहिती असून त्यातील काही रक्कम परत वसूल करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. अनुपकुमार यादव, महिला व बालकल्याण विभागाचे सचिव, यांनी ग्रामविकास विभागाकडून सविस्तर अहवाल मागवला होता. त्यानंतरच या कारवाईला गती देण्यात आली आहे. केवायसी प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस आल्याने शासनाने अपात्र लाभार्थ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
Ashok kharat case : भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक, अधिक गंभीर खुलासे
दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे लाभार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून पात्र आणि अपात्र यांची छाननी अधिक काटेकोरपणे केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी काळात आणखी लाभार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.








