व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Mlc election : भाजपमध्ये चलबिचल; दिल्लीतून काहींचे पत्ते ‘कट’, ३० वरून १४...

Mlc election : भाजपमध्ये चलबिचल; दिल्लीतून काहींचे पत्ते ‘कट’, ३० वरून १४ नावांवर आली यादी !

bjp-mlc-election-maharashtra-candidate-list-delhi-update-30-to-14-names-final-five-soon : विधानपरिषद निवडणुकीत, अंतिम पाच उमेदवारांवर लवकरच शिक्कामोर्तब

Mumbai : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात सध्या मोठी चुरस निर्माण झाली असून भाजपच्या गोटात उमेदवारीसाठी प्रचंड हालचाली सुरू आहेत. १२ मे रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत नऊ जागांसाठी मतदान होणार असून त्यापैकी पाच जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित करण्यासाठी जोरदार खलबते सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या कोअर कमिटीने तब्बल ३० इच्छुकांची यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती. मात्र, या यादीवर नाराजी व्यक्त करत केंद्रीय नेतृत्वाने अर्ध्याहून अधिक नावे वगळण्याचे निर्देश दिले. त्यानंतर राज्य नेतृत्वाने सुधारित यादी तयार करत केवळ १४ नावांवर ती मर्यादित केली असून ही यादी पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आली आहे. त्यामुळे मूळ ३० जणांपैकी कोणाचा पत्ता कट झाला, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Marathi compulsory : मराठी सक्तीवरून राज्यात रिक्षा-टॅक्सी क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण

उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षात मोठी रस्सीखेच सुरू असून अनेक इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे. संभाव्य नाराजी टाळण्यासाठी भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३० एप्रिललाच अंतिम यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, मुंबई वगळता राज्यातील विविध विभागांमधून प्रतिनिधित्व देण्याचा विचार असून संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः दिल्लीला रवाना झाले असून तेथे केंद्रीय नेतृत्वासोबत अंतिम चर्चेनंतर पाच उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. पुढील काही तासांत किंवा दिवसांत भाजपची अधिकृत उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Prataprao Jadhav : गडकरी, फडणवीस यांच्या होम पिचवर एकनाथ शिंदे यांचे ‘विदर्भ मिशन’

भाजपने यंदा लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना संधी न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्याऐवजी संघटनेत सक्रिय असलेल्या आणि सामाजिक-जातीय समीकरणे साधू शकणाऱ्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा कल असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे आणि संजय भेंडे यांची नावे चर्चेत आहेत.

एकूणच, दिल्लीतील अंतिम निर्णयानंतरच भाजपच्या पाच उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार असून त्यानंतरच राज्यातील विधानपरिषद निवडणुकीचे राजकारण आणखी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

error: Content is protected !!