व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Prataprao Jadhav : गडकरी, फडणवीस यांच्या होम पिचवर एकनाथ शिंदे यांचे ‘विदर्भ...

Prataprao Jadhav : गडकरी, फडणवीस यांच्या होम पिचवर एकनाथ शिंदे यांचे ‘विदर्भ मिशन’

Shivsena (Eknath Shinde) strengthens its presence in Nagpur; district reins handed over to Prataprao Jadhav : नागपुरात शिंदे सेनेची मोठी फिल्डिंग, प्रतापराव जाधवांकडे सोपवली जिल्ह्याची सूत्रे

Nagpur विदर्भाच्या राजकारणात आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता थेट नागपूरच्या बालेकिल्ल्यात मोठी राजकीय खेळी खेळली आहे. यवतमाळचे आमदार आणि राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना बाजूला सारून, आता केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची नागपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या होमपिचवर आता शिंदे सेनेने ‘विदर्भ मिशन’ अधिक आक्रमक केल्याचे या नियुक्तीवरून स्पष्ट झाले आहे.

एकेकाळी विदर्भात शिवसेना अतिशय प्रभावी होती, मात्र भाजपसोबतच्या युतीमध्ये जागावाटपाच्या गणितात शिवसेनेच्या विस्तारावर मर्यादा आल्या होत्या. मुंबईकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याने विदर्भातील संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष झाले आणि शिवसेना कमजोर झाली. हीच कसर भरून काढण्यासाठी आता शिंदे सेनेने कंबर कसली आहे. यापूर्वीच संजय निरुपम यांची जिल्ह्याचे संपर्क नेते म्हणून, तर डॉ. दीपक सावंत आणि आमदार मनीषा कायंदे यांची अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करून मोठी फळी तैनात करण्यात आली आहे.

Crime in Amravati : नगरसेविकेच्या पतीला मागितली ५० लाखांची खंडणी, पोलिस ठाण्यातच धमकी

दुसरीकडे, शिवसेना फुटीनंतर उद्धव सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दर महिन्याला नागपूरला येईल अशी मोठी घोषणा केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर त्यांचा हा उत्साह मावळला असून त्यांनी नागपूरकडे पाठ फिरवली आहे. राऊत सध्या नागपुरातून गायब असतानाच शिंदे सेनेने मात्र आपला संचार वाढवला आहे. संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रतापराव जाधव उद्या, मंगळवारी प्रथमच नागपुरात दाखल होत आहेत. जगनाडे चौकातील ‘बोगनविला’ येथे सकाळी ११ वाजता शिवसैनिकांच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Sudhir Mungantiwar : गरिबांच्या सन्मानार्थ, युवा वॉरियर्स मैदानात; मुनगंटीवारांनी दिला तरुणांना कानमंत्र

या बैठकीत आगामी राजकीय रणनीती आणि पक्ष बांधणीवर सविस्तर चर्चा होणार असून, यावेळी संपर्क प्रमुख संजय निरुपम, माजी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी खासदार कृपाल तुमाने, पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव आणि नागपूर जिल्हा प्रमुख सूरज गोजे यांसारखे मातब्बर नेते उपस्थित राहणार आहेत. या नव्या बदलामुळे नागपूरच्या शिवसैनिकांमध्ये नवा जोष निर्माण झाला असून, आगामी काळात शिंदे सेना विदर्भात कितपत प्रभाव पाडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!