shivaji-kon-hota-book-prashant-ambi-detained-buldhana-sanjay-gaikwad-controversy : प्रकाशक प्रशांत आंबी पोलिसांकडून स्थानबद्ध, वाद चिघळला
Buldhana : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यात सुरू असलेला वाद आता बुलढाण्यात चिघळला असून पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी ताब्यात घेत स्थानबद्ध केल्याची घटना समोर आली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे संजय गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन पुस्तकाचे जाहीर वाचन करणार होते. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले. सध्या त्यांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अलीकडेच आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या आरोपावरून प्रशांत आंबी यांच्यावर टीका करत त्यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर पुस्तकाचे सार्वजनिक वाचन करण्याचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला होता.
Weather alert : एका बाजूला उष्णतेची तीव्र लाट, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा
या आंदोलनात शेतकरी नेते अजित नवले, बी. जी. कोळसे पाटील यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पुरोगामी कार्यकर्त्यांचा सहभाग अपेक्षित होता. अंदाजे ५०० हून अधिक कार्यकर्ते बुलढाण्यात दाखल झाल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी पूर्वतयारी म्हणून कार्यक्रमस्थळी लावलेला मंडप हटवण्यास सांगितल्याचे तसेच इतर व्यवस्थाही थांबवण्यात आल्याचे समोर आले आहे. या कारवाईचा निषेध करत लोकशाही मार्गाने सभा घेण्यावरही मर्यादा येत असल्याचा सवाल आयोजकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका पुन्हा स्पष्ट करत पुस्तक वाचनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, वाचनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा योग्य सन्मान राखला गेला तर स्वागत केले जाईल, मात्र भावना दुखावल्यास त्याची जबाबदारी आयोजकांवर असेल, असा इशाराही त्यांनी दिला.
Iran US conflict : ‘होर्मुज’वरून तणाव शिगेला; ३ अटींवर अडले अमेरिका-इराण समीकरण
या सर्व घडामोडींमुळे बुलढाण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासन सतर्क झाले आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता राजकीय आणि सामाजिक पातळीवर अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे.








