iran-us-hormuz-strait-conditions-russia-support-global-tension-energy-crisis-news : तर रशियाच्या भूमिकेमुळे जागतिक राजकारण ढवळून निघाले
New Delhi : होर्मुज खाडीच्या प्रश्नावरून इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होत असताना दुसरीकडे रशियाने इराणच्या बाजूने भूमिका स्पष्ट केल्यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. होर्मुज खाडी खुली करण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर तीन महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत, तर अमेरिका त्यास नकारात्मक भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. या सगळ्या घडामोडींमुळे ऊर्जा बाजारासह आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अनिश्चितता वाढली असून जगाचे लक्ष मध्यपूर्वेतील परिस्थितीकडे लागले आहे.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर इराणने आखाती भागातील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार प्रत्युत्तर देत संघर्ष अधिकच चिघळवला. प्रारंभीच्या कारवाईत इराणच्या सर्वोच्च नेतृत्वावरही मोठा आघात झाला, तरीही इराणने माघार घेतली नाही. उलट अमेरिकेच्या नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून होर्मुज खाडी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक स्तरावर मोठे परिणाम दिसू लागले.
Mlc election : भाजपमध्ये चलबिचल; दिल्लीतून काहींचे पत्ते ‘कट’, ३० वरून १४ नावांवर आली यादी !
जगातील मोठ्या प्रमाणावर तेलवाहतूक या खाडीतून होत असल्यामुळे खाडी बंद झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून अनेक देशांमध्ये इंधन आणि एलपीजीचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर इराणने खाडी खुली करण्यासाठी अमेरिकेसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. त्यानुसार अमेरिकेने इराणविरोधातील नाकेबंदी पूर्णपणे हटवावी, इराणी जहाजांना स्वतंत्र आणि सुरक्षित मार्ग द्यावा तसेच सध्याच्या टप्प्यावर अणुकरारासंदर्भातील चर्चा बाजूला ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या अटी मान्य करण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी रशियाचा दौरा करत अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मॉस्कोमध्ये भेट घेतली. या भेटीनंतर रशियाने इराणच्या हितासाठी उभे राहण्याचा स्पष्ट संकेत दिला असून शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. पुतिन यांनी अमेरिकेवर टीका करत या संघर्षात अमेरिकेला अपेक्षित यश मिळाले नसल्याचेही नमूद केले.
Marathi compulsory : मराठी सक्तीवरून राज्यात रिक्षा-टॅक्सी क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण
अब्बास अराघची यांनीही अमेरिकेचे दावे फेटाळून लावत इराण चर्चेसाठी दबावाखाली नसल्याचे स्पष्ट केले. रशियासोबत सहकार्य अधिक दृढ करण्याचा इराणचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानमधील चर्चेनंतर थेट रशियात झालेली ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात असून यामुळे अमेरिकेवर अप्रत्यक्ष दबाव वाढल्याचे मानले जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे होर्मुज खाडीचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. एका बाजूला इराणच्या अटी, दुसऱ्या बाजूला अमेरिकेची कठोर भूमिका आणि त्यातच रशियाची साथ यामुळे परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने जगभरातील देश चिंतेत असून येत्या काळात या संघर्षावर कोणता तोडगा निघतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.








