legislative-council-candidates-assets-rise-neelam-gorhe-ambadas-danve-zeeshan-siddiquey : नीलम गोऱ्हे, अंबादास दानवे आणि झिशान सिद्दीकींच्या मालमत्तेत मोठी वाढ
Mumbai : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या संपत्तीची आकडेवारी समोर आली असून अनेक नेत्यांच्या मालमत्तेत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी यांच्या प्रतिज्ञापत्रांमधून कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे झिशान सिद्दीकी यांची संपत्ती अवघ्या दोन वर्षांत जवळपास चौपट झाल्याचे दिसून आले आहे.
राज्यात १२ मे रोजी विधान परिषद निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी पार पडणार आहे. एकूण नऊ जागांसाठी ही निवडणूक होत असून भाजपने पाच, शिवसेना शिंदे गटाने दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक आणि शिवसेना ठाकरे गटाने एका उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. भाजपकडून अतिरिक्त उमेदवार दिला जाईल, अशी चर्चा होती. मात्र शेवटच्या क्षणी अतिरिक्त उमेदवार न दिल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळालेल्या विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षांत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. २०२० मध्ये नीलम गोऱ्हे यांच्याकडे १.५७ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता होती, तर स्थावर मालमत्तेचे मूल्य सुमारे सहा कोटी रुपयांच्या घरात होते. मात्र २०२६ मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची जंगम मालमत्ता तब्बल ११.६६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय त्यांनी ७.६९ कोटी रुपयांची स्वअर्जित आणि १२.७६ कोटी रुपयांची वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांच्या नावावर ३४.६९ लाख रुपये किंमतीची टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही आलिशान गाडीही असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.
दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अंबादास दानवे यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीतही मोठी वाढ झाली आहे. २०१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार दानवे कुटुंबाची एकूण जंगम संपत्ती ६३.७८ लाख रुपये होती, तर ४६.२४ लाख रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता होती. पत्नी अनुराधा दानवे यांच्या नावावर १३.९४ लाख रुपयांचे कर्ज असल्याचेही त्यावेळी नमूद करण्यात आले होते.
Operation white strike : १,७४५ कोटींचे ३४९ किलो कोकेन जप्त, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट हादरले !
मात्र २०२६ मध्ये दाखल केलेल्या नव्या प्रतिज्ञापत्रात दानवे कुटुंबाची जंगम मालमत्ता २.३६ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे दिसून आले आहे. तर स्थावर मालमत्ता ५.०६ कोटी रुपये इतकी झाली आहे. कुटुंबीयांवर एकूण ८.९६ कोटी रुपयांचे कर्ज असल्याची नोंदही प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या पत्नी अनुराधा दानवे यांच्या नावावर मर्सिडीज बेन्झ ही आलिशान कार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळालेल्या झिशान सिद्दीकी यांच्या संपत्तीतील वाढ विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ५.२० कोटी रुपयांची जंगम आणि ३१.६९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली होती. त्यावेळी त्यांच्यावर ८.७७ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
मात्र अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी झेप घेतल्याचे नव्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे. २०२६ मध्ये त्यांनी २१.१७ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. स्थावर मालमत्तेत काहीशी घट झाली असली तरी ती अद्याप २८.७४ कोटी रुपयांवर आहे. त्यांच्या कर्जाच्या रकमेतीलही थोडी घट होऊन ती आता ८.६९ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे.
Ashok kharat case : समता पतसंस्था गैरव्यवहार प्रकरण तापलं; प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स !
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या या आकडेवारीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नेत्यांच्या वाढत्या संपत्तीचा मुद्दा चर्चेत आला आहे. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेचे तपशील आणि त्यातील वाढ यावरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.








