व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ncp leadership conflict : प्रफुल्ल पटेल विरुद्ध पार्थ पवार शीतयुद्ध उघड !

Ncp leadership conflict : प्रफुल्ल पटेल विरुद्ध पार्थ पवार शीतयुद्ध उघड !

ncp-leadership-conflict-praful-patel-vs-parth-pawar-cold-war-ajit-pawar-party-crisis : राष्ट्रवादीत सत्ता-संघर्ष पेटला, पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर

Mumbai : अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र समोर येत आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील वाढते शीतयुद्ध आता उघडपणे चर्चेत आले असून राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. पक्षाच्या निर्णयप्रक्रियेपासून संघटनात्मक बदलांपर्यंत अनेक मुद्द्यांवरून दोन्ही गटांमध्ये मतभेद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदी निवडीच्या प्रक्रियेनंतर या संघर्षाला अधिक धार मिळाल्याचे मानले जात आहे. २८ जानेवारी ते १० मार्चदरम्यान झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असे पत्र सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला पाठवण्यात आल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला होता. या निर्णयामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात नाराजी निर्माण झाल्याची चर्चा होती. सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असताना प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नवी दिल्लीत उपस्थित असूनही त्यांनी अंतर राखल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पवार कुटुंब आणि पटेल-तटकरे गटामधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.

Devendra Fadnavis: नरसापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला फासावर लटकवणारच

या घडामोडींनंतर पार्थ पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे कौतुक करणारे पत्रक प्रसिद्ध केले होते. मात्र, त्या पत्रकातून पक्षातील तणाव मिटल्यापेक्षा संघर्ष अधिक ठळक झाल्याची चर्चा सुरू झाली. राजकीय वर्तुळात या पत्रकाकडे ‘डॅमेज कंट्रोल’ म्हणून पाहिले गेले. मात्र अंतर्गत नाराजी अद्याप कायम असल्याचे सांगितले जात आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी दिल्लीतील राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांच्या ‘डिझाइन बॉक्स’ या कंपनीकडे प्रसिद्धी आणि प्रचाराचे काम सोपवण्यात आले होते. अरोरा यांच्या सल्ल्यानुसार अजित पवार यांनी विशेष प्रकारचे जाकीट परिधान करण्यास सुरुवात केली होती. तसेच निवडणूक प्रचाराची रणनीती आखण्यातही अरोरा यांची भूमिका प्रभावी मानली जात होती. त्यामुळे पक्षात त्यांचे महत्त्व वाढले होते. मात्र पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पोलिसांनी अरोरा यांच्या पुण्यातील कार्यालयावर छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या कारवाईबाबत अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.

Tcs crime news : पेयातून गुंगीचं औषध देत महिलांचं शोषण धर्मांतर रॅकेटच्या संशयाने खळबळ

यानंतर पक्षात आणखी एक मोठा वाद उफाळला. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांना पक्षाध्यक्ष आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव नरेश अरोरा यांनी दिल्याची चर्चा रंगली. या प्रस्तावामुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते अस्वस्थ झाले. त्यानंतर अरोरा यांच्या कंपनीकडून प्रसिद्धीचे काम काढून घेण्यात आले. प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील संघर्षातूनच अरोरा यांची हकालपट्टी झाल्याची चर्चा आता पक्षाच्या गोटात सुरू झाली आहे.

दरम्यान, पक्षातील जुन्या आणि अनुभवी नेत्यांमध्ये पार्थ पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत नाराजी वाढत असल्याचे बोलले जात आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करताना पार्थ पवार यांनी पुण्यातील एका उद्योगपतीच्या मुलाच्या नावासाठी आग्रह धरल्याची चर्चा होती. मात्र त्या नावाला पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी विरोध केल्याने अखेर माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली. या घटनेनंतर पक्षातील दोन वेगवेगळे गट अधिक स्पष्टपणे समोर आल्याचे मानले जात आहे.

Iran war threat : ट्रम्प यांच्या युद्धाच्या इशाऱ्याने जग हादरलं!

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या जिल्ह्यांतील पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावरील फलकांवर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांची छायाचित्रे नसल्याची बाबही राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. याकडे केवळ योगायोग म्हणून न पाहता पक्षातील वाढत्या नाराजीचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या या शीतयुद्धामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटनात्मक फेरबदलांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र दिसणारा पक्ष आता विविध गटांमध्ये विभागला जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष आणखी उघड होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

___

error: Content is protected !!