maharashtra-cabinet-reshuffle-before-diwali-eknath-shinde-big-changes-ministers-likely-out : एकनाथ शिंदे काही महिन्यात भाकरी फिरवणार
Mumbai : राज्यातील सर्व निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली असून येत्या काही महिन्यात राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून तयार करण्यात आलेल्या रिपोर्ट कार्डमुळे अनेक बड्या मंत्र्यांच्या खुर्च्या धोक्यात आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून मंत्र्यांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला जात असून ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही किंवा ज्यांनी आपल्या विभागात आणि जिल्ह्यात प्रभावी कामगिरी केली नाही, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. निष्क्रिय मंत्र्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देत सरकारमधून बाजूला केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
conflicts in mahayuti : खामगावात महायुतीत तडे; शिंदेसेना-राष्ट्रवादी जवळीक वाढली!
या संभाव्य फेरबदलामध्ये नव्या आणि आक्रमक चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सध्या राज्यमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या काही नेत्यांना कॅबिनेटमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे, तर मतदारसंघात प्रभावी कामगिरी करणाऱ्या आणि पक्षाची पकड मजबूत करणाऱ्या आमदारांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळू शकते. त्यामुळे अनेक इच्छुक आमदारांमध्ये उत्सुकता वाढली असून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.
या फेरबदलामागे आगामी निवडणुकांचे गणित असल्याचे सांगितले जात आहे. पुढील दोन वर्षांत विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने सत्तेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी हे बदल आवश्यक मानले जात आहेत. काही खात्यांमध्ये कामाचा वेग मंदावल्याच्या तक्रारी समोर आल्यामुळे त्या ठिकाणी सक्षम नेतृत्व देण्याची गरजही अधोरेखित झाली आहे.
Buldhana Politics : लोकार्पण झाले, पण श्रेय घेण्यासाठी वाद नाही; असे कसे राजकारण?
सूत्रांच्या माहितीनुसार, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही मंत्र्यांच्या कामगिरीवर वरिष्ठ स्तरावर नाराजी आहे. तसेच, जे मंत्री वादात अडकले आहेत किंवा ज्यांच्याबद्दल स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे, त्यांनाही या फेरबदलाचा फटका बसू शकतो. या संभाव्य निर्णयामुळे विद्यमान मंत्र्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून इच्छुक आमदारांच्या आशा मात्र उंचावल्या आहेत.
दिवाळीपूर्वी होणारा हा मंत्रिमंडळ फेरबदल राज्याच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.








