Surprise over display of political maturity after the inauguration of an MRI centre : एमआरआय सेंटरच्या उद्घाटनानंतर राजकीय समजूतदारपणाचे आश्चर्य
Buldhana जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय सेंटरच्या लोकार्पणामुळे आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडली असली, तरी या कार्यक्रमानंतर श्रेयवादाचा नेहमीचा गदारोळ न झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. सामान्यतः अशा महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर विविध लोकप्रतिनिधींकडून श्रेय घेण्यासाठी स्पर्धा रंगते; मात्र यावेळी चित्र पूर्णपणे वेगळे दिसले.
पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते एमआरआय सेंटरचे लोकार्पण पार पडले. या सुविधेमुळे जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार असून, वेळ आणि खर्च दोन्हींची बचत होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, या प्रकल्पासाठी नेमका पुढाकार कोणी घेतला, निधी कोणी उपलब्ध करून दिला किंवा सातत्याने पाठपुरावा कोणी केला, याबाबत नेहमीप्रमाणे राजकीय दावे समोर आले नाहीत.
Farmers loan waiver : पदयात्रा की राजकारण? शेतकऱ्यांना ठोस दिलासा कधी?
विशेष म्हणजे, एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तत्काळ प्रसिद्धीपत्रके काढून ‘आमच्या प्रयत्नांतूनच हा प्रकल्प साकारला’ असा दावा करणारे नेते यावेळी मात्र शांत राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे हा बदल नेमका का घडला, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आरोग्य क्षेत्रातील अशा प्रकल्पांमागे अनेक पातळ्यांवरील प्रक्रिया असतात. प्रशासकीय मंजुरी, निधीची तरतूद आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा या सर्व घटकांचा त्यात समावेश असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्ती किंवा गटाला पूर्ण श्रेय देणे तितकेसे योग्य नसल्याची जाणीव यावेळी राजकीय स्तरावर झाली का, अशीही चर्चा रंगली आहे.
Bacchu Kadu : धनुष्यबाण हाती घेतल्यावर बच्चू कडूंचे ‘टार्गेट’ कोण?
दरम्यान, नागरिकांनी मात्र या घडामोडीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले आहे. किमान या महत्त्वाच्या आरोग्य सुविधेच्या निमित्ताने तरी राजकारण आडवे आले नाही, याचे समाधान व्यक्त केले जात आहे. रुग्णसेवेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या एमआरआय सेंटरमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून, भविष्यातही अशाच प्रकल्पांमध्ये श्रेयवादाऐवजी समन्वयाला प्राधान्य दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








