maharashtra-self-census-low-response-muth-village-becomes-first-complete-self-enumeration-village : ‘मुठ’ गाव ठरले पहिले पूर्ण स्वयं-गणना करणारे गाव
Mumbai : भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच नागरिकांना देण्यात आलेल्या ‘स्वगणना’ पर्यायाला महाराष्ट्रातून अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यातील तब्बल ११ कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या आणि कोट्यवधी कुटुंबांच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४ लाख ७१ हजार नागरिकांनीच ऑनलाईन माहिती भरून स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे. दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘मुठ’ गावाने संपूर्ण स्वयं-गणना पूर्ण करून राज्यातील पहिले गाव होण्याचा मान मिळवला आहे.
महाराष्ट्र दिनापासून राज्यात स्वगणना मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. देशातील प्रत्येक नागरिकाला प्रथमच स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ८ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ५ लाख ७५ हजार ७९३ कुटुंबांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. त्यापैकी फक्त ४ लाख ७१ हजार नागरिकांनी माहिती अंतिम करून स्वगणना यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात २.४४ कोटींहून अधिक कुटुंबे होती. यामध्ये ग्रामीण भागातील सुमारे १.३२ कोटी आणि शहरी भागातील सुमारे १.१२ कोटी कुटुंबांचा समावेश होता. त्या तुलनेत आतापर्यंतची ऑनलाईन नोंदणी अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील डिजिटल सुविधा वाढल्या असतानाही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
Nashik-tcs-case : टीसीएस प्रकरणात मोठे धागेदोरे, ‘एमआयएम कनेक्शन’नंतर राजकीय खळबळ !
स्वगणना प्रक्रियेत नागरिकांकडून एकूण ३३ प्रश्नांची माहिती घेतली जात आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुटसुटीत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात नागरिकांचा सहभाग मर्यादित राहिल्याचे दिसत आहे. ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा १५ मेपर्यंत उपलब्ध राहणार असून त्यानंतर १५ मे ते १४ जूनदरम्यान जनगणना विभागाचे प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. ऑनलाईन माहिती भरल्यास नागरिकांचा आणि प्रगणकांचा वेळ वाचणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
राज्यातील अधिकाधिक नागरिकांनी स्वयं-गणनेत सहभागी व्हावे यासाठी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर रितु तावडे तसेच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्वतः ऑनलाईन माहिती भरून नागरिकांना आवाहन केले होते. मात्र, या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
जनगणना विभागाने नागरिकांना स्वगणना करताना अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच माहिती भरावी, तसेच जनगणनेसंबंधित संदेशांमध्ये ‘RGICEN’ हा कीवर्ड तपासूनच पुढील प्रक्रिया करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. संशयास्पद संदेशांना प्रतिसाद देऊ नये, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
Reservation for local : भूमिपुत्रांसाठी फडणवीस सरकारचा मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक !
जनगणनेत भरलेली माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जनगणना कायद्यानुसार ही माहिती न्यायालयीन पुरावा म्हणून वापरता येत नाही, तसेच आयकर विभाग, पोलीस यंत्रणा किंवा इतर तपास यंत्रणांनाही ती उपलब्ध करून दिली जात नाही. माहितीच्या अधिकाराखालीही ही माहिती मिळवता येत नसल्याने नागरिकांनी निर्धास्तपणे माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘मुठ’ गावाने राज्यासाठी आदर्श निर्माण केला आहे. गावात एकूण ३६ घरे, ४३ कुटुंबे आणि १४४ लोकसंख्या असून प्रशासनाच्या पुढाकारातून सर्व कुटुंबांनी अचूक माहिती भरून स्वयं-गणना प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे ‘मुठ’ हे राज्यातील पहिले पूर्ण स्वयं-गणना करणारे गाव ठरले आहे.








