Rashtrawadi Congress Warns Administration: Family Use of Government Vehicles on Holidays Will Be Curbed to Save Fuel : एक दिवसाचा दिखावा नको; सातत्यपूर्ण सार्वजनिक वाहतुकीवर राष्ट्रवादीचा भर
Nagpur : देशात वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन, वीज आणि सोने खरेदी कमी करण्याचे आवाहन केले असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने या मुद्द्यावरून शासकीय अपव्यय, आर्थिक शिस्त आणि प्रशासकीय कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इंधन आणि पैशांची खरी बचत करायची असेल, तर शासकीय कार्यालयांतील अनागोंदी आणि सुटीच्या दिवशी होणारा सरकारी वाहनांचा गैरवापर थांबवावा, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली आहे. सुटीच्या दिवशी शासकीय वाहनांचा वापर अधिकाऱ्यांच्या कुटुंबासाठी होऊ देणार नाही, असा थेट इशारा देत यासाठी पक्षाकडून राज्यभर व्यापक अभियान राबवले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.
या संदर्भात नागपुरात भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते प्रशांत पवार यांनी प्रशासकीय दिरंगाईमुळे होणाऱ्या इंधनाच्या अपव्ययावर जोरदार टीका केली. जिल्हाधिकारी कार्यालय, टाऊन प्लॅनिंग, तलाठी कार्यालय, सिटी सर्व्हे, महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि तहसील कार्यालयांमध्ये दररोज हजारो नागरिकांना किरकोळ कामांसाठी अनेक फेऱ्या माराव्या लागतात, असे त्यांनी सांगितले.
एका नागरिकाला एखाद्या कामासाठी दररोज एक लिटर पेट्रोल लागत असेल, तर अशा हजारो नागरिकांच्या सततच्या चकरांमुळे हजारो लिटर इंधनाचा अपव्यय होत आहे. हा अपव्यय आणि मानसिक त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक कामासाठी निश्चित तारीख द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. ऑनलाईन व्यवस्थेच्या केवळ घोषणा होतात; प्रत्यक्षात फाईल कुठे आहे किंवा आक्षेप काय आहे, हे जाणून घेण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात, अशी टीका त्यांनी केली.
हा मनस्ताप आणि वेळेचा अपव्यय रोखला, तर जनतेचा पैसा आणि इंधन दोन्ही मोठ्या प्रमाणावर वाचू शकते. इतकेच नव्हे, तर हा फॉर्म्युला वापरल्यास मुख्यमंत्र्यांना इंधन बचतीसाठी ‘बुलेट’वरून फिरण्याची गरज पडणार नाही, असा टोला देखील प्रशांत पवार यांनी लगावला.
मुख्यमंत्री जनता दरबार घेत असतील, तर त्यातून लोकांचे प्रश्न मार्गी लागायला हवेत. मात्र, त्या दरबारात मांडलेल्या समस्यांचे उत्तर जर वर्षभरानंतर मिळत असेल, तर अशा उपक्रमांचा नेमका उपयोग काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
याच मुद्द्यावर पुढे बोलताना राष्ट्रवादीच्या नगरसेविका व गटनेत्या आभा पांडे यांनी महापालिकेतील भ्रष्ट आणि सुस्त कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. महापालिकेत एकाच कामासाठी नागरिकांना अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात. कधी आयुक्त उपलब्ध नसतात, कधी जेई अनुपस्थित असतात, तर कधी डेप्युटी आयुक्त जागेवर नसतात, अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी कार्यालयातील उपस्थितीची वेळ निश्चित करून नागरिकांना त्यानुसार बोलवावे. संबंधित अधिकारी उपलब्ध असतील, त्याच दिवशी नागरिकांना कामासाठी बोलावल्यास जनतेची गैरसोय टळेल आणि इंधनाचीही मोठी बचत होईल, असे त्या म्हणाल्या.
Abhijit sapkal : SIR अभियानासाठी काँग्रेस सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांची राज्य समन्वयकपदी नियुक्ती
केवळ एक दिवस ऑटो किंवा बसने प्रवास करून इंधन बचतीचा संदेश दिला जाणार नाही. लोकप्रतिनिधींनी सातत्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला पाहिजे. तसेच शासकीय वाहनांचा कौटुंबिक वापर रोखण्यासाठी आणि अधिकाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता रस्त्यावर उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“आम्ही गाड्या वापरू नका, असे म्हणत नाही. मात्र अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी शासकीय वाहनांचा वापर केवळ कामासाठीच केला पाहिजे,” असे आभा पांडे यांनी सांगितले.








