vidhan-parishad-election-2026-mahayuti-conflict-konkan-pune-seat-dispute : कोकणात साळवी विरुद्ध तटकरे संघर्ष, पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत जागेवरून रस्सीखेच
Mumbai : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठा अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून जागावाटपावरून मित्रपक्षांमध्ये उघड चढाओढ सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांची निवडणूक जाहीर करताच कोकण आणि पुणे या दोन महत्त्वाच्या जागांवरून महायुतीतील शिंदे शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या जागांवर नेमका दावा कोणाचा, यावरून वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. या जागेवर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांनी थेट दावा ठोकला आहे. राजन साळवी यांनी या निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक हालचालीही सुरू केल्या असून महायुतीत सर्वाधिक मतदार आमच्या पक्षाकडे असल्याने ही जागा नैसर्गिकरित्या शिवसेनेलाच मिळायला हवी, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील, असे सांगितले. त्यामुळे कोकणातील ही जागा शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
Anil deshmukh : ‘आधी ओबीसींचा कॉलम आणा, मगच जनगणनेचे दप्तर उघडा’
दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जागेवर दावा कायम ठेवला आहे. मात्र कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहता शिंदे शिवसेनेचे पारडे जड असल्याचे स्पष्ट होत आहे. कोकण मतदारसंघात शिंदे शिवसेनेकडे २३६ मतदार आहेत, तर भाजपकडे १५१ आणि अजित पवार गटाकडे केवळ ६३ मतदार आहेत. त्यामुळे ही जागा सोडण्यास शिवसेना तयार नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही महायुतीत मोठा संघर्ष उभा राहिला आहे. २०२२ पासून रिक्त असलेली ही जागा यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. माजी आमदार अनिल भोसले या जागेवरून निवडून आले होते. मात्र राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर भाजपने आता या जागेवर आक्रमक दावा करण्यास सुरुवात केली आहे. पुणे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने अलीकडच्या काळात मोठे वर्चस्व निर्माण केल्याने पक्ष या जागेवर मागे हटण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे सांगितले जात आहे.
Bachchu kadu : बच्चू कडूंवर शिंदेंचा मोठा डाव; भाजपची विदर्भातील डोकेदुखी वाढणार!
पुणे मतदारसंघात अजित पवार गटाकडे ३४४ मतदार आहेत, तर भाजपकडे ३०६ मतदार आहेत. शिंदे शिवसेनेचे ६८ मतदार असल्याने अंतिम निर्णयात त्यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि पुणे महापालिकेतील अनुभवी नेते गणेश बीडकर यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. त्याचबरोबर माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही विधान परिषदेसाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना विधान परिषदेचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा पक्षात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या जागेसाठी अनेक इच्छुक सक्रिय झाले आहेत. माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर योगेश बहल आणि खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय विक्रम काकडे यांची नावे चर्चेत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे हातात घेतलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर जागावाटपाचा हा पहिलाच मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. महायुतीत समन्वय राखत स्वतःची ताकदही दाखवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर उभे ठाकले आहे.
Ncp strategist : अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठा राजकीय गेमप्लॅन! बदलले रणनीतीकार
दरम्यान, राज्यातील पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, अमरावती, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना अशा एकूण १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना २५ मे रोजी जारी होणार असून १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जूनला मतमोजणी पार पडणार आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील अंतर्गत संघर्ष पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे समोर येताना दिसत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांपूर्वीच मित्रपक्षांमधील स्पर्धा तीव्र झाल्याचे चित्र राज्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
__








