prashant-kishor-appointed-ncp-strategist-ajit-pawar-party-new-political-plan : डिझाईन बॉक्सच्या ‘गुलाबी कॅम्पेन’नंतर आता प्रशांत किशोरांची एन्ट्री
Mumbai : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि २०२९ च्या विधानसभा-लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी राजकीय रणनीती आखली जात असून पक्षाने आता निवडणूक व्यवस्थापनासाठी नवे ‘चाणक्य’ मैदानात उतरवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ‘गुलाबी कॅम्पेन’ राबवणाऱ्या डिझाईन बॉक्सच्या जागी आता प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.
१९ मे रोजी झालेल्या बैठकीत प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वामध्ये सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू झाले असून येत्या दोन दिवसांत सर्व औपचारिकता पूर्ण होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १ जूनपासून प्रशांत किशोर यांच्या टीमकडून राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. आगामी तीन वर्षांचा राजकीय आराखडा, पक्ष संघटन मजबूत करणे, युवा मतदारांपर्यंत पोहोचणे आणि अजित पवार यांची प्रतिमा नव्याने उभारणे यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
Petrol diesel price : इंधन दरवाढीचा दुहेरी झटका! चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग
प्रशांत किशोर हे देशातील सर्वात प्रभावी राजकीय रणनीतीकारांपैकी एक मानले जातात. ‘पीके’ म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या प्रचार मोहिमेचे नियोजन करून राष्ट्रीय पातळीवर मोठी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशात वाय. एस. जगन मोहन रेड्डी, तामिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिन तसेच दिल्लीमध्ये आम आदमी पक्षासाठी निवडणूक रणनीती आखून यश मिळवले. सध्या ते ‘जन सुराज’ या राजकीय उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत.
दरम्यान, यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी डिझाईन बॉक्स कंपनीकडून प्रचार मोहिमांचे नियोजन करण्यात येत होते. कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवार यांची प्रतिमा बदलण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर झाल्यानंतर अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये दिसू लागले होते आणि त्यानंतर पक्षाच्या प्रचारात गुलाबी रंगाचे मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत या ‘गुलाबी कॅम्पेन’ची मोठी चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकीत झालेल्या धक्क्यानंतर पक्षाला नव्याने उभे करण्याची जबाबदारी नरेश अरोरा आणि त्यांच्या टीमवर सोपवण्यात आली होती.
Chandrashekhar bawankule : विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न
मात्र आता पक्षाने अधिक आक्रमक आणि दीर्घकालीन राजकीय रणनीतीसाठी प्रशांत किशोर यांच्यावर विश्वास दाखवला आहे. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र ओळख मजबूत करणे, ग्रामीण भागात संघटन विस्तार करणे आणि युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवे प्रयोग करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आता मोठे राजकीय बदल सुरू झाल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली








