व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar bawankule : पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यास सपकाळ यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही

Chandrashekhar bawankule : पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यास सपकाळ यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही

Chandrashekhar bawankule attacks harshwardhan sapkal: चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागपुरात थेट इशारा

Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अश्लील आणि खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात तीव्र शब्दांत कडाडून हल्ला चढवला. सपकाळ यांनी अत्यंत मूर्खपणाचे, नीचपणाचे आणि नालायकपणाचे वक्तव्य केले असून, त्यांनी आपली राजकीय उंची किती आणि आपण कोणावर बोलतोय याचे भान ठेवावे, असा टोला त्यांनी लगावला. यापुढे जर सपकाळ यांनी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीची अश्लील भाषा वापरली, तर भाजपचे कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत, असा थेट आणि गंभीर इशारा बावनकुळे यांनी दिला. या बेजबाबदार वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना महसूलमंत्र्यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरही महत्त्वाची माहिती दिली. महायुतीमधील जागावाटपाची चर्चा ९९ टक्के पूर्ण झाली असून, तिन्ही पक्षांतील प्रमुख नेते एकत्र बसून यावर अंतिम शिक्कामोर्तब करतील. महायुतीचे जागावाटप उद्यापर्यंत अधिकृतपणे जाहीर होईल, असे स्पष्ट करत यासाठी दिल्लीला बैठकीची कोणतीही गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. आमचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि दोन्ही मित्रपक्षांचे नेते सक्षम असून ते आपापसात बसून हा निर्णय करू शकतात. याच वेळी त्यांनी काँग्रेसला खोचक सल्ला दिला की, विधान परिषदेच्या विविध मतदारसंघांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांचे जवळपास ७० टक्के बहुमत आहे. त्यामुळे या कडक उन्हाळ्याच्या दिवसांत निवडणुकीचा अनावश्यक खर्च न करता, काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध करावी. शेवटी निवडणुकीचा निर्णय बहुमतानेच होत असतो, त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा विचार करून विरोधकांनी सामंजस्य दाखवावे, अशी विनंती त्यांनी केली.

Ncp meeting : तटकरेची नाराजी, पटेलांची गैरहजेरी, भुजबळांसोबत चकमक, राष्ट्रवादीत अस्वस्थता !

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या चर्चांवर बोलताना बावनकुळे यांनी या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सांगत त्या फेटाळून लावल्या. छगन भुजबळ काल रात्री उशिरापर्यंत माझ्यासोबतच होते, त्यामुळे वादाची बातमी कुठून आली हे मला माहित नाही, असे ते म्हणाले.

दुसरीकडे, महसूल विभागाने विविध प्रशासकीय सुधारणांमध्ये मोठी झेप घेतली आहे. विविध सरकारी दाखले आणि प्रमाणपत्रे घेण्यासाठी जनतेला होणारा त्रास कमी करत आम्ही ही प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ केली आहे. महसूल आणि आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या अफाट मेहनतीमुळेच ‘जीपीआर अहवालात’ महसूल विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, जनता आता उत्कृष्ट सेवांचा लाभ घेत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

error: Content is protected !!