Congress leader from Amravati may join Eknath Shinde’s Shivsena : सुधाकर भारसाकळेंचे शक्तिप्रदर्शन, शिंदेसेनेत जाण्याचे संकेत
Amravati काँग्रेसच्या दर्यापूर तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुधाकर भारसाकळे यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी माहेश्वरी भवन येथे आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात हजारो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी नव्या राजकीय भूमिकेचे संकेत देत शिंदेसेनेत प्रवेशाची दिशा स्पष्ट केली. त्यांच्या भूमिकेला स्थानिक पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील नेते आणि लोकप्रतिनिधींचा मिळालेला पाठिंबा पाहता दर्यापूर काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडण्याची चर्चा रंगू लागली आहे.
सहकार क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या सुधाकर भारसाकळे यांच्या मेळाव्यास दर्यापूर-अंजनगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rahul Bondre : ‘मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढली’, काँग्रेस नेत्याची टीका
यावेळी बोलताना भारसाकळे यांनी नाव न घेता काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वावर निशाणा साधला. “मी आयुष्यभर निःस्वार्थ भावनेने माणसे जोडण्याचे काम केले. मात्र काही ठिकाणी माझ्यावर अविश्वास दाखवण्यात आला. विनाकारण टीका-टिप्पणी करण्यात आली. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी खालच्या पातळीवरील अफवा पसरवण्यात आल्या,” असा आरोप त्यांनी केला. मेळाव्याला खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गजानन जाधव, काही संचालक, बाजार समितीचे उपसभापती राजू कराळे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष तसेच काही नगरसेवक मंचावर उपस्थित होते.
सुधाकर भारसाकळे यांच्या भूमिकेला काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी उघड पाठिंबा दिल्याचे चित्र मेळाव्यात दिसून आले. बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, विविध सोसायट्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक पदाधिकारी त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याने दर्यापूरमध्ये काँग्रेसची ताकद कमी होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.








