Pravin pote filed nomination for legislative election from BJP, Shivsena leader bajoria filed indipendent nomination: विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील वाद चव्हाट्यावर, अपक्ष लढणार असल्याचा बाजोरियांचा दावा
Amravati विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीसमोर अंतर्गत आव्हान उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विरोधात शिवसेना नेते विप्लव बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपाकडून प्रवीण पोटे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाने सलग तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास दाखविल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ही निवडणूक पुन्हा जिंकण्याचा विश्वास प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला.
प्रवीण पोटे यांना २०१२ मध्ये प्रथमच भाजपाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाली होती. त्यानंतर २०१८ मध्येही त्यांनी विजय मिळविला. राज्य सरकारमध्ये ते राज्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले असून अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांनी भूषविले आहे.
दरम्यान, शिवसेना नेते विप्लव बाजोरिया यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वडील व शिवसेना नेते गोपीकिसन बाजोरिया उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना विप्लव बाजोरिया यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. अमरावती जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी निवडणूक लढविण्याची विनंती केल्यामुळे आपण मैदानात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीत फूट पडल्याच्या चर्चांबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र अशा शक्यता फेटाळून लावल्या. महायुतीत कोणतीही फूट नसून नाराज कार्यकर्ते किंवा नेते अनेकदा उमेदवारी अर्ज दाखल करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून संबंधित उमेदवारांशी संवाद साधला जाईल आणि अंतिम टप्प्यात सर्वजण एकत्र दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Atul Londhe : अतुल लोंढे लढणार की माघार घेणार?; काँग्रेसमधील संभ्रम उघड
याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने नागपूरचे हर्षजीत देशमुख यांना उमेदवारी दिली असून या मतदारसंघात चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.








