व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Atul Londhe : अतुल लोंढे लढणार की माघार घेणार?; काँग्रेसमधील संभ्रम उघड

Atul Londhe : अतुल लोंढे लढणार की माघार घेणार?; काँग्रेसमधील संभ्रम उघड

Four Congress workers file nomination papers for the Legislative Council election : विधान परिषदेच्या निवणुकीवरून काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता, विकास ठाकरे गट बैठकीला अनुपस्थिती

Nagpur विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर काँग्रेसमध्ये प्रचंड राजकीय नाट्य पाहायला मिळाले. अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघा एक तास शिल्लक असताना काँग्रेसने आपले उमेदवार निश्चित केले. प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पक्षाच्या एकूण चार कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अतुल लोंढे यांच्या अर्जासोबत पक्षाचा ‘एबी फॉर्म’ जोडलेला असल्याने तेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचे मानले जात आहेत. मात्र, तरीही पक्षांतर्गत असलेला मोठा संभ्रम आणि नाराजी या निमित्ताने उघड झाली आहे.

वास्तविक पाहता, नागपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांच्याकडे सुमारे ५०० मतदारांचे भक्कम संख्याबळ असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. याच पराभवाच्या भीतीपोटी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास सुरुवातीला कोणीही इच्छुक नव्हते आणि विजयाची खात्री नसल्यानेच उमेदवारी निश्चित करण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाला प्रचंड कसरत करावी लागली.

El Nino : ‘पाण्याचा सातबारा’ तयार होणार; पाणी बचत करणाऱ्यांच्या खात्यावर ‘अ‍ॅक्वा क्रेडिट्स’!

उमेदवार ठरवण्यासाठी सोमवारी सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत रविभवन येथील कॉटेज क्रमांक १२ मध्ये काँग्रेस नेत्यांची जोरदार खलबते सुरू होती. या बैठकीला निवडणूक प्रमुख आमदार नितीन राऊत, सुनील केदार, नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल गडधे आणि ग्रामीण अध्यक्ष अश्विन बैस प्रामुख्याने उपस्थित होते. या निवडणुकीची संपूर्ण धुरा सुनील केदार यांच्या खांद्यावर असल्याने उमेदवार ग्रामीण भागातीलच असेल, असा दावा केला जात आहे.

एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलेले असताना, दुसरीकडे काँग्रेसचेच माजी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि त्यांचे समर्थक मात्र या महत्त्वपूर्ण बैठकीकडे फिरकलेच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेत काँग्रेसचे ३३ नगरसेवक निवडून आलेले असताना, गटनेते संजय महाकाळकर आणि इतर दोन-चार जण वगळता एकाही नगरसेवकाने रविभवनकडे पाठ फिरवल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

दुपारी दोनच्या सुमारास बैठकीतून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांनी अतुल लोंढे यांना घेरले असता, एकाच पक्षातून चार जणांनी अर्ज का भरले, यावर त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. मी केवळ उमेदवारी अर्ज दाखल करत आहे, एवढेच मोजके उत्तर देऊन त्यांनी अधिक बोलणे टाळले. पक्षाचा मुख्य उमेदवार कोण आणि अधिकृत ‘एबी फॉर्म’ नक्की कोणाला मिळाला, यावरही त्यांनी मौन बाळगल्याने संभ्रमात अधिकच भर पडली.

Central Railway : ११६ वर्षांची प्रतीक्षा संपणार कधी? खामगाव-जालना रेल्वेमार्ग अजूनही कागदावरच

लोंढे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनेश ढोले आणि इतर दोघांनी अर्ज भरल्यामुळे, शेवटच्या दिवशी उर्वरित उमेदवार माघार घेतील असा अंदाज असला, तरी लोंढे स्वतः ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्यास मानसिकदृष्ट्या तयार आहेत की नाही, याबाबत आता राजकीय वर्तुळात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!