व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Praful gudadhe: भाजपचे दुकान माझ्या वडिलांनी उघडले, मुलगा म्हणून शटर मीच बंद...

Praful gudadhe: भाजपचे दुकान माझ्या वडिलांनी उघडले, मुलगा म्हणून शटर मीच बंद करणार

Praful Gudhe vows to shut down the BJP : नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष प्रफुल गुडधेंचा एल्गार, सेल्फीसाठी नाही रस्त्यावर उतरून काम करण्याचे आवाहन

Nagpur नागपूर शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळताच प्रफुल गुडधे पाटील यांनी थेट भाजपला आव्हान देत, नागपुरात भाजपचे दुकान आमच्या वडिलांनी उघडले होते, आता त्यांचा मुलगा म्हणून ते दुकान बंद करण्याचे आणि भाजपचे शटर पाडण्याचे काम मीच करेन, असा विश्वास व्यक्त केला.

गुडधे यांचा पदग्रहण सोहळा देशपांडे सभागृहात पार पडला. या वेळी त्यांनी आपल्या भाषणातून पक्षांतर्गत गटबाजी मऊ करत भाजपविरोधातील वैचारिक लढाई तीव्र करण्याचे संकेत दिले. काँग्रेसमध्ये कोणाचाही अपमान होणार नाही, प्रत्येकाला मानसन्मान दिला जाईल, अशी ग्वाही देत गुडधे यांनी काँग्रेस मंचावरूनच पक्षाचे ‘तंतू’ जुळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

Nagpur congress : प्रफुलभाऊ सावध राहा… विकास ठाकरे यांनी सांगितली काँग्रेसची खरी संस्कृती

प्रफुल गुडधे पाटील यांनी आपल्या भाषणात भूतकाळातील आठवणींना उजाळा देत भाजप सोडण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, १९९९ माझे वडील विनोद गुडधे पाटील यांनी भाजप सोडला. भाजपमध्ये आम्हाला प्रचंड अव्यवस्था दिसली. तिथल्या व्यवस्थेत बहुजनांना किंमत नाही, त्यांना फक्त गर्दी आणि संख्या दाखवण्यासाठी वापरले जाते, हे लक्षात आल्यावर आम्ही उद्विग्न झालो होतो. माझी राजकीय लिगसी ही डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या विचारांची आहे. माझ्या भावाला जेव्हा असाध्य आजार झाला होता, तेव्हा जिचकर दादांनीच आम्हाला धीर दिला होता. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दादांच्या चार वर्षांच्या सहवासात माझी वैचारिक अधिष्ठाने पक्की झाली आणि तिथूनच माझा खऱ्या अर्थाने काँग्रेसमधील प्रवास सुरू झाला. २००२ मध्ये मी पहिली महापालिका निवडणूक लढलो. भाजप आणि काँग्रेसमधील फरक स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले, काँग्रेसमध्ये विचारस्वातंत्र्य (फ्रीडम) आहे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात हे स्वातंत्र्य टिकून आहे. पण ज्या देशात आणि भाजप पक्षात लोकशाही धोक्यात आहे, तिथे हे स्वातंत्र्य अजिबात नाही. २०१४ च्या निवडणुकीनंतर देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आले असून निवडणुका केवळ औपचारिकता उरल्या आहेत. कारण सर्व यंत्रणा सत्ताधाऱ्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. अशा स्थितीत आता काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही.

नागपूरच्या स्थानिक राजकारणावर आणि विकासाच्या मॉडेलवर थेट प्रहार करताना गुडधे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. सिमेंटचे रस्ते आणि उड्डाणपूल बांधणे म्हणजे विकास नव्हे. आज नागपूरच्या विकासाचे मॉडेल काय आहे? या सत्ताधाऱ्यांनी आमच्या सुंदर ‘ऑरेंज सिटी’ला भ्रष्टाचाराचा अड्डा आणि ‘ड्रग सिटी’ बनवून सोडले आहे, याविरोधात आपल्याला मोठा लढा उभा करावा लागेल. भाजपने बाजार उठवले. सन्मान आणि कष्टाने पोट भरणाऱ्यांना हाकालले. कस्टकऱ्यांचा लढ्या पासून आपणास सुरुवात करायची आहे. मात्र मी हे एकटा करू शकणार नाही. तुम्हा सर्वांची साथ लागणार आहे. हा लढा मी एकटा लढू शकत नाही. काँग्रेस म्हणजे केवळ नेते नव्हे, तर सामान्य लोकांचा समूह आहे. आपल्याला लोकांचे सामूहिक हित जोपासावे लागेल. पक्षाचे मुख्य कार्यालय असलेले ‘देवडिया भवन’ सर्वांसाठी सदैव उघडे राहील. आपल्याला सोशल मीडिया किंवा केवळ सेल्फी काढण्यासाठी काम करायचे नाही, ते केवळ एक माध्यम आहे. आपल्याला प्रत्यक्ष जमिनीवर उतरून लोकांसाठी काम करावे लागेल. ज्या व्हेंडर (फेरीवाले) बाजारांना उद्ध्वस्त करण्यात आले, आपला लढा त्या गरिबांसाठी आहे.

Rajya sabha seat : भुजबळ आघाडीवर तर नवनीत राणा, ठाकरे गटाच्या माजी खासदाराच्या नावाचीही चर्चा !

गटबाजीच्या आणि अंतर्गत आव्हानांच्या मुद्द्यावर उत्तर देत गुडधे म्हणाले, काँग्रेसमधील गटबाजी कशी सांभाळायची, हे मला ठाऊक आहे. मी चरखा चालवतो आणि धागे जोडतो; त्यामुळे पक्षातील सर्व तंतू कसे जुळवायचे, हे मी करून दाखवेन. मी वयाने आणि पदाने लहान असू शकतो, पण मी ग्वाही देतो की काँग्रेसमध्ये कोणाचाही अपमान होणार नाही, सर्वांचा मानसन्मान राखला जाईल. आपण ही विखुरलेली शक्ती एकत्र करून विचारांची लढाई लढू आणि आगामी निवडणुका जिंकून दाखवू. प्रफुल गुडधे पाटील यांच्या या भूमिकेमुळे आणि आक्रमक पवित्र्यामुळे नागपूर काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, अंतर्गत मतभेद विसरून भाजपच्या ‘किल्ल्याला’ सुरुंग लावण्याचे मोठे आव्हान आता नवनिर्वाचित अध्यक्षांसमोर असणार आहे.

error: Content is protected !!