Vikas Thakre warns praful gudadhe to be cautious of congress’ true political culture: भविष्यातील निवडणुका जिंकून दाखविण्याचे दिले आव्हान
Nagpur नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीचे राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी नवनिर्वाचित शहराध्यक्ष प्रफुल गुडधे पाटील यांना पदभार स्वीकारताच घरच्याच भेदींपासून सावधान राहण्याचा इशारा दिला.
गुडधे यांचा पदग्रहण सोहळा शनिवारी देशपांडे सभागृहात पार पडला. मंचावर सतीश चतुरवेदी, गेव्ह आवारी, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार अभिजित वंजारी, किशोर कन्हेरे यांच्यासह अनेक आजीमाजी पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषण करताना विकास ठाकरे यांनी 13 वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेताना कोण विरोधात काम केले, कोण किती काम केले, किती जण आंदोलनात आले याचा सर्व रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझ्याविरोधात कटकारस्थान केले, मला पाडण्याच्या सुपाऱ्या घेतल्या असा खळबळजनक आरोप करत ठाकरे यांनी मंचावरूनच गुडधे यांना सतर्कतेचा इशारा दिला आणि पक्षातील कोणकोणत्या नेत्यांपासून धोका आहे, याचे थेट संकेत दिले. काँग्रेसमध्ये अध्यक्ष कोणीही असो, पाठीमागून वार करायला काही लोक तयारच असतात. सर्वाना खूष करता येत नाही. महपालिकेत 150 जागा असतात. दोन हजार जण तिकीट मागतात. नाराज झालेल्या दीड हजार लोकांना अंगावर घ्यावे लागते. कार्यकारणीत कोणाला घ्यावे हे अध्यक्ष ठरवत नाही. नेतेच यादी पाठवतात. एकदा नाव आले नंतर पक्षाचे काम करायला कोणी येत नाही या कडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.
Rajya sabha seat : भुजबळ आघाडीवर तर नवनीत राणा, ठाकरे गटाच्या माजी खासदाराच्या नावाचीही चर्चा !
आपल्या आक्रमक भाषणात विकास ठाकरे यांनी काँग्रेसच्या संस्कृतीवर बोट ठेवताना सांगितले की, मी १९८४ पासून काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. पश्चिम नागपूर हा भाजपचा गड होता आणि तिथे कार्यकर्त्यांची टंचाई असताना मी पक्ष उभा केला, ५ चे ११ नगरसेवक आणले. पण विधानसभेच्या निवडणुकीत मला हरवण्यासाठी आमच्याच एका नेत्याने एकाला उभे केले. अमरावतीवरून एक महिला येत होती. मात्र मी जिंकलो. बाकी खड्ड्यात गेले. विकास ठाकरेंना हरवण्याची मोठे षडयंत्र रचले होते. मी या सर्व सगळ्याचा भुक्तभोगी आहे. पक्ष चालवणे ही काही जादूची छडी नाही. त्यासाठी अंगावर घ्यावे लागते, असे स्पष्ट करत त्यांनी बड्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मी १३ वर्षांत ७७ आंदोलने केली, पण आंदोलनाच्या वेळी आणि पक्षाचे मुख्यालय असलेल्या ‘देवडिया भवन’मध्ये मोठे नेते कधीच येत नव्हते. आज मंचावर २०० लोक आहेत आणि सभागृहात २ हजार कार्यकर्ते उपस्थित आहेत, पण देवडिया भवनमध्ये मात्र कोणीच दिसत नाही, माझी ३०० लोकांची कार्यकारिणी होती पण बैठकीला फक्त ३० जण यायचे, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल गुडधे यांना धीर देताना ठाकरे म्हणाले की, प्रफुल भाऊ, तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे; पण तुम्हाला आता आगामी महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जिंकून दाखवाव्या लागतील. फक्त घोषणा देऊन आणि झेंडे हलवून चालणार नाही, तर जनतेला रिझल्ट द्यावा लागेल. जे पक्षात राहून भाजपची ‘सुपारी’ घेतात, अशा अंतर्गत शत्रूंपासून प्रफुल भाऊंनी सावध राहावे. आता झाले गेले मी विसरलो. तुम्हीही विसरा. आता नव्या अध्यक्षाला साथ द्या. किमान देवडिया भावनात तरी या असा सल्लाही त्यांनी सर्वाना दिला.
विकास ठाकरे यांच्या या थेट आणि टोकदार विधानांमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात, विशेषतः काँग्रेस गोटात प्रचंड खळबळ उडाली असून, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्यासमोर आगामी काळात पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचे आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.








