maharashtra-vidhan-parishad-election-2026-voting-process-quota-and-key-contests : 6 जागां बिनविरोध, जाणून घ्या मतदानाची संपूर्ण प्रक्रिया आणि विजयाचा कोटा
Mumbai : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले असून 17 पैकी 6 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 11 मतदारसंघांमध्ये 18 जून रोजी मतदान होणार असून अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती रंगण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय समीकरणांवरही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांमध्ये मतदानाची पद्धत सर्वसाधारण निवडणुकांपेक्षा वेगळी असते. या निवडणुका प्रमाण प्रतिनिधित्व पद्धतीनुसार आणि एकल हस्तांतरणीय मत प्रणालीद्वारे घेतल्या जातात. त्यामुळे मतदारांनी दिलेल्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांना विशेष महत्त्व प्राप्त होते.
या निवडणुकीत मतदार म्हणून नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील निवडून आलेले सदस्य मतदान करतात. मतदान करताना मतदार उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहितात. पहिल्या पसंतीसाठी ‘1’, दुसऱ्या पसंतीसाठी ‘2’ आणि तिसऱ्या पसंतीसाठी ‘3’ असा क्रमांक नमूद करता येतो. पहिल्या पसंतीच्या मतांना सर्वाधिक महत्त्व असते. एखाद्या उमेदवाराला विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पहिल्याच फेरीत प्राप्त झाल्यास त्याला थेट विजयी घोषित केले जाते.
जर कोणत्याही उमेदवाराला आवश्यक कोटा मिळाला नाही, तर सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराची मतपत्रिका बाद केली जाते आणि त्यावरील पुढील पसंतीची मते इतर उमेदवारांना हस्तांतरित केली जातात. ही प्रक्रिया विजेता निश्चित होईपर्यंत सुरू राहते. त्यामुळे प्रत्येक पसंतीचे मत निर्णायक ठरू शकते.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच महायुतीने सहा जागांवर बिनविरोध विजय मिळवत राजकीय आघाडी घेतली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी या जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने थेट विधान परिषदेत प्रवेश मिळवला आहे.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून अरुण लखाणी आणि अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे.
Ncp congress merger : शरद पवार गटाच्या काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चां, नाना पटोलें अचानक दिल्लीत !
उर्वरित 11 मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत. सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात थेट सामना रंगणार आहे. जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शरद तायडे आणि अपक्ष रेश्मा काळे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
सांगली-सातारा मतदारसंघात धैर्यशील कदम, अभयसिंह जगताप आणि किशोर धुमाळ यांच्यात सामना होणार असून नांदेडमध्ये अमर राजूरकर आणि रामदास पाटील आमनेसामने असतील. नागपूर पोटनिवडणुकीत डॉ. राजीव पोतदार आणि अतुल लोंढे यांच्यात प्रतिष्ठेची लढत होणार आहे.
भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली तसेच छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघांमध्येही बहुरंगी राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि पसंतीक्रमाच्या मतांचे गणित या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरणार आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी 25 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून होती. अर्जांची छाननी 2 जून रोजी पार पडली, तर 4 जूनपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. आता 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणीद्वारे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
Sunetra pawar : पक्षहितासाठी कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही!
राज्यातील उर्वरित 11 जागांसाठी होणाऱ्या मतदानाकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले असून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, पक्षांतर आणि पसंतीक्रमाच्या मतांचे गणित यावरच अनेक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.








