nagpur-congress-setback-20-buti-bori-councillors-meet-bawankule-atul-londhe-mlc-election : बुटीबोरीच्या २० नगरसेवकांची बावनकुळेंसोबत बैठक
Nagpur : विधान परिषद निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. काँग्रेस समर्थित ‘परिवर्तन आघाडी’च्या तब्बल २० नगरसेवकांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत भाजपचे उमेदवार डॉ. राजू पोतदार हे देखील उपस्थित होते. त्यामुळे या नगरसेवकांचा कल भाजपकडे झुकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भाजपच्या बैठकीत सहभागी झालेले सर्व २० नगरसेवक बुटीबोरी नगरपालिकेचे आहेत. बुटीबोरी नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी काँग्रेस नेते सुनील केदार यांनी पक्षाचे अधिकृत चिन्ह न वापरता विविध अपक्ष गटांना एकत्र करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका सदस्याला उमेदवारी दिल्याच्या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाले होते. निवडणुकीनंतर या नगरसेवकांनी ‘परिवर्तन आघाडी’ नावाने स्वतंत्र गटाची नोंदणी केली. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही पक्षाचा व्हीप किंवा शिस्तीचे नियम लागू होत नाहीत. याच परिस्थितीचा फायदा घेत या नगरसेवकांनी बावनकुळे यांच्या बैठकीला उपस्थिती दर्शवून भाजपला मतदान करण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे.
El Nino : 1950 नंतरचा सर्वात भीषण ‘एल निनो’ सक्रिय! डिसेंबरमध्ये धारण करणार अतितीव्र रूप
नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने डॉ. राजू पोतदार यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसकडून पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे मैदानात आहेत. उपलब्ध संख्याबळानुसार भाजपकडे सुमारे ५२० मते तर काँग्रेसकडे जवळपास २०० मतांचे पाठबळ असल्याचे मानले जाते. संख्याबळाच्या दृष्टीने भाजपची बाजू भक्कम दिसत असली तरी पक्षाने कोणतीही जोखीम न पत्करता आपल्या मतदारांना गोव्यात हलवले आहे. हे सर्व मतदार प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने गोव्यात असून मतदानाच्या दिवशीच नागपुरात परतणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उर्वरित मतदार गटांवरही लक्ष केंद्रित केले असून बुटीबोरीतील नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर भाजपने इतर नगरपालिकांमधील मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांना स्वतःची हक्काची मते टिकवून ठेवण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे.
नागपूर महापालिकेतील काँग्रेसचे ३३ नगरसेवक माजी शहराध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे यांच्या गटाचे मानले जातात. नव्याने नियुक्त झालेल्या शहराध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्या पदग्रहण सोहळ्याला या नगरसेवकांपैकी बहुतांश जण अनुपस्थित राहिल्याने पक्षातील अंतर्गत नाराजी उघड झाली आहे. या घडामोडींमुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
Ashok kharat case : खरात प्रकरणात मोठी घडामोड! विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
एका बाजूला बुटीबोरीतील २० नगरसेवकांनी दिलेला धक्का आणि दुसऱ्या बाजूला नागपूर महापालिकेतील अंतर्गत मतभेद, अशा दुहेरी संकटात अतुल लोंढे अडकले आहेत. विकास ठाकरे आणि प्रफुल गुडधे यांच्यातील मतभेद दूर करून मतांचे गणित जुळवण्यात ते कितपत यशस्वी ठरतात, यावरच आता नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची प्रतिष्ठा अवलंबून असल्याचे मानले जात आहे.








