नितीन तिवारी यांच्याकडे प्रभारी जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे
Nagpur शिवसेनेच्या (शिंदे गट) नागपूर वर्तुळात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एका गंभीर फौजदारी प्रकरणात नाव आल्याने शहरातून फरार असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांचे पक्षातून पंख छाटण्यात आले आहेत. गोजे यांच्या जागी आता आक्रमक नेते नितीन तिवारी यांची प्रभारी जिल्हाप्रमुखपदी वर्णी लावण्यात आली असून, त्यांच्यावर मध्य आणि उत्तर नागपूर या दोन विधानसभा मतदारसंघाची धुरा सोपवण्यात आली आहे.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर सुरज गोजे यांची चांगलीच ‘लॉटरी’ लागली होती. शिंदे सेनेने गोजे यांना नागपूर महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून पाठवले, तसेच नागपूर जिल्हा नियोजन समितीवरही त्यांची नियुक्ती केली होती. एकाच व्यक्तीला तीन-तीन महत्त्वाची पदे बहाल केल्यामुळे पक्षात अंतर्गत प्रचंड नाराजी उफाळून आली होती. त्यातच गोजे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने आणि ते पोलिसांना गुंगारा देऊन संपर्काबाहेर गेल्याने पक्षाची नाहक बदनामी होत होती. तांत्रिकदृष्ट्या गोजे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपद कायम ठेवले असले, तरी त्यांची पक्षातून हाकालपट्टी आता निश्चित मानली जात आहे.
दुसरीकडे, प्रभारी जिल्हाप्रमुखपदी निवड झालेले नितीन तिवारी यांचा राजकीय प्रवासही चांगलाच वादळी ठरला आहे. नागपूर महापालिका निवडणुकीदरम्यान तत्कालीन उद्धव सेनेमध्ये असताना तिवारी आणि जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांच्यात एकाच प्रभागातील एका जागेवरून जुंपली होती. कुमेरिया यांनी ओबीसी प्रवर्गातून तर तिवारी यांनी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र, कुमेरिया यांनी ऐनवेळी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरल्याने तिवारी यांची अडचण झाली. दोन्ही नेत्यांकडे पक्षाचे ‘एबी फॉर्म’ असताना कुमेरिया यांनी आधी अर्ज दाखल केल्याने त्यांना पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळाले.
या धक्कातंत्रामुळे चिडलेल्या नितीन तिवारी यांनी पक्षाविरुद्ध उघड बंड पुकारले होते. कुमेरिया यांचे भाजपसोबत साटेलोटे असल्याचा सनसनाटी आरोप करत त्यांनी थेट आव्हान दिले होते. या बंडखोरीमुळे तिवारी यांचे शहरप्रमुखपद काढून घेण्यात आले. अपमानित झालेल्या तिवारी यांनी तत्काळ उद्धव सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे सेनेत प्रवेश केला होता.
पक्षांतराचा तिवारी यांना अखेर फायदा झाला असून, त्यांच्यावर मध्य व उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाची प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून मोठी जबाबदारी सोपवली आहे. गोजे यांच्या पलायनामुळे बॅकफूटवर गेलेल्या शिंदे सेनेला तिवारी यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे नवसंजीवनी मिळते का, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








