rohit-pawar-farm-loan-waiver-hunger-strike-pandharpur-second-day-government-talks : कर्जमाफीसाठी रोहित पवारांचा अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस
Pandharpur : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि २०१९ च्या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधत, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. कर्जमाफीतील जाचक अटी हटवून सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. जोपर्यंत दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी सर्वांना मिळत नाही आणि अटी रद्द होत नाहीत, तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील. आम्हीही जिद्दी आहोत आणि आता माघार घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पंढरपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवार यांची राज्याचे कृषिमंत्री आणि सहकार मंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणली. या चर्चेत कर्जमाफीतील जाचक अटी हटवण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, सरकारने केवळ चर्चेवर न थांबता अधिकृत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. राज्यातील संबंधित मंत्र्यांनी माध्यमांसमोर येऊन कर्जमाफीतील अटी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यास आंदोलन स्थगित करण्याचा विचार करू, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रश्नावर अंतिम तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवार किंवा मंगळवारी मुंबईत विशेष बैठक घेण्याचे आश्वासन मंत्र्यांकडून देण्यात आल्याचेही समजते.
Lonar Lake : वैज्ञानिकांसाठी जिवंत प्रयोगशाळा, पण संरक्षणाची वानवा; लोणारची परिसंस्था धोक्यात?
दरम्यान, आंदोलनाची माहिती राज्यासह देशभरातील विविध शेतकरी संघटनांपर्यंत पोहोचली असून अनेक शेतकरी नेते पंढरपूरकडे रवाना होत असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेतेही आंदोलनस्थळी भेट देण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनामुळे कुटुंबीय भावनिक झाल्याचाही उल्लेख रोहित पवार यांनी केला. त्यांचे वडील कालपासून आंदोलनस्थळी उपस्थित आहेत, तर पत्नी आणि मुलांकडून आंदोलन थांबवून घरी परतण्याचे संदेश येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सुरू केलेला लढा अर्धवट सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शक्तिपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जात असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र विविध अटी का लादल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकरी संकटात असताना सरकारने त्यांना तातडीचा दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
दुसरीकडे, रोहित पवार यांच्या आंदोलनावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना सरकारची भूमिका मांडली. राज्यातील सुमारे ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून निवडणूक आचारसंहितेमुळे काही बाबींवर सध्या भाष्य करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर आंदोलन करण्याचे कारण समजत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
Operation tiger : ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना नवे वळण; ठाकरे गटातील खासदार शिंदेंच्या संपर्कात !
उदय सामंत म्हणाले की, एखाद्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी आंदोलन करू नये. सरकार पात्र शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेईल. कर्जमाफीतील अटींबाबतही शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील चर्चेच्या पुढील फेऱ्यांमधून काय निर्णय होतो आणि आंदोलनाला कोणते राजकीय व सामाजिक पाठबळ मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








