व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Lonar Lake : वैज्ञानिकांसाठी जिवंत प्रयोगशाळा, पण संरक्षणाची वानवा; लोणारची परिसंस्था धोक्यात?

Lonar Lake : वैज्ञानिकांसाठी जिवंत प्रयोगशाळा, पण संरक्षणाची वानवा; लोणारची परिसंस्था धोक्यात?

Lack of protection puts Lonar Lake’s ecosystem at risk : रामसरचा मान मिळाला, पण संवर्धनाचे भान कुठे?; लोणारच्या जैवविविधतेसमोर वाढती आव्हाने

Lonar २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील रामसर आर्द्रक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर लोणार सरोवराचे महत्त्व जगभरात अधिक अधोरेखित झाले. उल्कापातातून निर्माण झालेल्या या अद्वितीय विवर-सरोवरातील क्षारयुक्त व अल्कधर्मी परिसंस्था, दुर्मीळ सूक्ष्मजीव, विशेष प्रकारचे शैवाल आणि स्थलांतरित पक्ष्यांमुळे लोणार संशोधकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मात्र जागतिक मान्यता मिळाल्यानंतरही संवर्धनाच्या पातळीवर अनेक प्रश्न कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नासा, स्मिथसोनियनसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी लोणारचा सखोल अभ्यास केला आहे. सरोवरातील काही सूक्ष्मजीव पृथ्वीवरील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन कसे टिकून राहते, याचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे लोणार हे केवळ पर्यटनस्थळ नसून एक जिवंत वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणूनही ओळखले जाते.

Nagpur congress : नागपुरात काँग्रेसला मोठे खिंडार; अतुल लोंढेंची वाढली चिंता

मात्र दुसरीकडे वाढता पर्यटन दबाव, प्लास्टिक कचऱ्याची समस्या, अनियंत्रित वाहनांची वर्दळ, परिसरातील अतिक्रमणे आणि पर्यावरणीय नियमांच्या अपुऱ्या अंमलबजावणीमुळे सरोवराच्या परिसंस्थेवर ताण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. रामसर दर्जा मिळाल्यानंतर अपेक्षित असलेली स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा, सातत्यपूर्ण पर्यावरणीय निरीक्षण आणि प्रभावी संवर्धन कृती आराखड्याची अंमलबजावणी अद्यापही अपेक्षित स्तरावर झालेली नसल्याची टीका पर्यावरण अभ्यासकांकडून केली जाते.

लोणारची जैवविविधता जागतिक स्तरावर महत्त्वाची मानली जाते. येथील क्षारयुक्त आणि अल्कधर्मी पाण्यात टिकणारे सूक्ष्मजीव व जीवसृष्टी अत्यंत दुर्मीळ असून स्थलांतरित पक्ष्यांसाठीही हे महत्त्वाचे अधिवास क्षेत्र आहे. त्यामुळे लोणारचा अभ्यास पर्यावरण, जीवशास्त्र तसेच अवकाश संशोधनासाठीही उपयुक्त ठरतो.

El Nino : 1950 नंतरचा सर्वात भीषण ‘एल निनो’ सक्रिय! डिसेंबरमध्ये धारण करणार अतितीव्र रूप

रामसर दर्जा हा गौरवाचा विषय असला तरी त्यासोबत संवर्धनाची जबाबदारीही तितकीच मोठी आहे. जागतिक वारसा आणि स्थानिक व्यवस्थापन यांच्यातील दरी कमी करून प्रभावी संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्याची गरज आता अधिक तीव्रतेने जाणवत आहे. अन्यथा जागतिक स्तरावर मिळालेली प्रतिष्ठा टिकविण्याचे मोठे आव्हान भविष्यात उभे राहू शकते.

error: Content is protected !!