व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sunil Kedar: ‘असली खेल अभी बाकी है’, भाजपच्या एकतर्फी विजयाच्या दाव्याला सुनील...

Sunil Kedar: ‘असली खेल अभी बाकी है’, भाजपच्या एकतर्फी विजयाच्या दाव्याला सुनील केदारांचे जाहीर आव्हान

nervous BJP has sent its councillors to Goa, quips Sunil Kedar : धास्तावलेल्या भाजपने नगरसेवकांना पाठवले गोव्याला, काँग्रेस नेत्याचा टोमणा; विधान परिषद निवडणूक रंगात

Nagpur नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण कमालीचे तापले असून भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये थेट ‘माइंड गेम’ सुरू झाला आहे. आम्ही आधीच बहुमताचा आकडा गाठला असून ही निवडणूक एकतर्फी जिंकू,” असा थेट दावा भाजपचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून केला जात आहे. बुटीबोरी नगरपालिकेच्या काँग्रेस समर्थक २० नगरसेवकांनी भाजपच्या गोटात प्रवेश केल्याने भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. नागपूर महापालिकेत भाजप-शिवसेना युतीचे १०३, हिंगणा विधानसभा मतदारसंघात १२० तर जिल्ह्यातील २९ नगरपालिकांपैकी २५ पालिकांवर भाजपची तर दोनवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. एकूण ८३६ मतदारांपैकी तब्बल ५८२ मते महायुतीकडे असल्यामुळे हा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र, भाजपच्या या विजयाच्या छातीठोक दाव्याला काँग्रेसचे आक्रमक नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी जोरदार ‘खो’ दिला असून भाजपला थेट आणि सूचक इशारा दिला आहे. धोका अजून टळलेला नाही, खरा खेळ मतपेटीतूनच समोर येईल, अशा शब्दांत केदारांनी भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण केली आहे.

माध्यमांशी बोलताना सुनील केदार यांनी भाजपच्या दाव्यांमधील हवाच काढून घेतली. ते म्हणाले की, कोणी कुठल्या पक्षाच्या बैठकीला गेले किंवा नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, म्हणजे ते त्यांनाच मतदान करतील असे मुळीच होत नसते. शेवटी हे गोपनीय मतदान आहे. मतदार मतदान केंद्राच्या आत जाऊन नेमका कोणाच्या नावापुढे ठप्पा मारतो, हे बाहेर बसून कोणीही सांगू शकत नाही आणि हा मोठा धक्का भाजपला थेट निकालानंतरच कळेल, असा टोला त्यांनी लगावला. विशेष म्हणजे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळवून देण्यापासून ते रणनीती आखण्यापर्यंत सुनील केदार यांनीच मुख्य भूमिका बजावली आहे. उमेदवार ठरवण्यापूर्वी झालेल्या सर्व घडामोडी आणि महत्त्वपूर्ण बैठकांना केदार स्वतः उपस्थित होते. त्यामुळे केदार यांचे हे वक्तव्य केवळ राजकीय विधान नसून, भाजपच्या विरोधात पडद्यामागे काहीतरी मोठी रणनीती आणि गनिमी कावा सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.

White line controversy : जैन धर्मगुरू, स्थानिक महिलेत चकमक, मनसे आक्रमक महापालिकेची कारवाई !

सुनील केदार यांचा राजकीय इतिहास पाहता भाजप देखील त्यांना हलक्यात घेण्याची चूक करू शकत नाही, याची प्रचिती आता येऊ लागली आहे. नुकत्याच झालेल्या रामटेक लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामठी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली होती. विद्यामान महसूलमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पारवे यांच्या विजयाची शंभर टक्के हमी घेतली होती. भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली असतानाही सुनील केदार यांच्यावर काहीही फरक पडला नाही. त्यांनी एकहाती ताकद लावून श्यामकुमार बर्वे यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा सांभाळली आणि मोठ्या मतांच्या फरकाने हा मतदारसंघ काँग्रेसच्या पदरात पाडून भाजपला धोबीपछाड दिली. यापूर्वी नागपूर जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता असतानाही, महाविकास आघाडीच्या काळात सुनील केदार यांनीच आपल्या चाणक्यनीतीने ती सत्ता काँग्रेसकडे खेचून आणली होती.

Rohit pawar strike : शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवारांचा आक्रमक एल्गार

हा सर्व इतिहास पाहता केदार यांचे ताजे वक्तव्य भाजपसाठी धोक्याची मोठी घंटा मानली जात आहे. कदाचित भाजपलाही पडद्यामागच्या या हालचालींची आणि केदार फॅक्टरची जाणीव झाली असावी. कारण, कागदावर ५८२ मतांचे प्रचंड बहुमत दिसत असतानाही भाजपने कोणताही धोका न पत्करता आपल्या नगरसेवकांना आधीच सुरक्षित स्थळी म्हणजेच थेट गोव्याला रवाना केले आहे. विरोधकांकडून ‘क्रॉस व्होटिंग’ किंवा मोठी फूट पाडण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणूनच भाजपने हे पाऊल उचलल्याची जोरदार चर्चा आहे. हे सर्व नगरसेवक आता थेट मतदानाच्या दिवशीच नागपुरात दाखल होणार आहेत. त्यामुळे एका बाजूला भाजपचा आकड्यांचा आत्मविश्वास आणि दुसऱ्या बाजूला सुनील केदार यांचा इतिहास आणि गुप्त रणनीती, यामुळे नागपूर विधान परिषदेची ही लढाई आता अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची बनली आहे.

error: Content is protected !!