dadar-white-line-controversy-jain-community-mns-sandeep-deshpande-mumbai : दादरमधील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला;
Mumbai : दादर पश्चिम परिसरातील रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून निर्माण झालेला वाद आता अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे. जैन धर्मगुरूंच्या मार्गक्रमणासाठी रस्त्यांवर विशेष पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या काढण्यात आल्याचा आरोप होताच मनसेने आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक स्वरूप धारण केले असून महापालिकेलाही तातडीने हस्तक्षेप करावा लागला.
दादर पश्चिम येथील डी. एस. बाबरेकर मार्ग आणि गोखले मार्ग परिसरात जैन धर्मगुरूंच्या मार्गक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या रंगविण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रकारावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र आक्षेप घेत संबंधित पट्टे तात्काळ हटवण्याची मागणी केली. अन्यथा मनसे कार्यकर्ते स्वतः कारवाई करतील, असा इशाराही त्यांनी दिला होता.
मनसेच्या या भूमिकेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जैन समाजाच्या प्रतिनिधींनीही यावर आपली बाजू मांडली. परिस्थिती बिघडू नये यासाठी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महापालिकेने तातडीने कारवाई करत संबंधित रस्त्यांवरील पांढरे पट्टे थिनरच्या सहाय्याने हटवण्यास सुरुवात केली.
दरम्यान, या वादाला आणखी एक वळण मिळाले ते जैन धर्मगुरू आणि स्थानिक मराठी महिला यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे. माध्यमांशी संवाद साधताना काही स्थानिक महिला आपली भूमिका मांडत असताना वादावादीची परिस्थिती निर्माण झाली. या वेळी आवाज चढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याची चर्चा रंगली आहे.
Rohit pawar strike : शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवारांचा आक्रमक एल्गार
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी मनसेवर टीका केली. दोन समाजांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जैन समाज हा शांततेवर विश्वास ठेवणारा समाज आहे, मात्र शांततेचा अर्थ कमकुवतपणा समजू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर समाजातील नागरिकांनी संयम राखावा आणि कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
संदीप देशपांडे यांच्या भूमिकेवर भाष्य करताना निलेशचंद्र मुनी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व समाजांना समान सन्मान दिला होता. जैन आणि मारवाडी समाजाविषयीही त्यांनी नेहमीच आदराची भूमिका ठेवली होती, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
दुसरीकडे, संदीप देशपांडे यांनी दादरमधील रस्त्यांवरील पांढरे पट्टे निश्चित मुदतीत हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर मनसे कार्यकर्ते स्वतः त्या पट्ट्यांवर काळा रंग फासतील, असा इशारा त्यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत रंग हटवण्याची प्रक्रिया सुरू केली.
Legislative election : भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने ‘वंचित’ला पाठिंबा द्यावा
सध्या पांढऱ्या पट्ट्यांचा प्रश्न प्रशासनाने मार्गी लावला असला तरी या प्रकरणामुळे सामाजिक संवेदनशीलता, सार्वजनिक रस्त्यांचा वापर आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्थांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. तसेच या वादाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिक्रिया समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








