व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nashik mlc election : गोकुळ गीते माघारीनंतरही महायुती सतर्क; नाशिकचे नगरसेवक थेट...

Nashik mlc election : गोकुळ गीते माघारीनंतरही महायुती सतर्क; नाशिकचे नगरसेवक थेट रिसॉर्टमध्ये

nashik-vidhan-parishad-election-2026-councillors-shifted-bhiwandi-resort-after-gokul-gite-withdrawal : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेश म्हस्केंनी दिले स्पष्टीकरण

Nashik : नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही महायुतीने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीतील संभाव्य राजकीय उलथापालथ टाळण्यासाठी नाशिकमधील नगरसेवकांना थेट भिवंडी येथील रिसॉर्टमध्ये हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सुमारे २० ते २२ नगरसेवकांना भिवंडीतील अंजूर परिसरातील साया ग्रँड रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान मतांमध्ये फूट पडू नये, यासाठी ही रणनीती आखण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

रात्री उशिरा शिवसेना नेते तथा खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झालेले रविंद्र फाटक यांनी रिसॉर्टमध्ये जाऊन नगरसेवकांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आले. गोकुळ गीते यांनी माघार घेतल्यानंतरही नगरसेवकांना रिसॉर्टमध्ये ठेवण्याची गरज का भासली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

मात्र, या सर्व घडामोडींना राजकीय रंग देण्याचे कारण नसल्याचे नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा शिवसेनेचा विभागीय मेळावा असल्याचे सांगितले. नगरसेवकांच्या उपस्थितीत संघटनात्मक चर्चा आणि पक्षीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, नाशिक विधान परिषद निवडणुकीत मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीवरून विविध स्तरांवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने महायुतीची चिंता वाढली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि उदय सामंत यांनी नाशिकमध्ये ठाण मांडून समन्वय साधल्याची चर्चा होती.

अखेर दीर्घ चर्चेनंतर गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीला पाठिंबा जाहीर केला. मात्र, निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक बाबींमुळे गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांची नावे मतपत्रिकेवर कायम राहणार आहेत. त्यामुळे नाराज मतदार किंवा अंतर्गत गटबाजीमुळे काही सदस्यांनी पसंतीक्रम मतदानात वेगळी भूमिका घेतल्यास निवडणुकीचे समीकरण बदलू शकते, अशी भीती महायुतीच्या नेत्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

Ubt matoshree meeting : मातोश्रीवरील बैठकीत सर्व ९ खासदार सहभागी !

नाशिक विधान परिषद निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान होत असल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षीय व्हिपची अंमलबजावणी मर्यादित स्वरूपात होत असल्याने मतदानाच्या वेळी सदस्यांना तुलनेने अधिक स्वातंत्र्य असते. त्यामुळे ऐनवेळी मतांचे ध्रुवीकरण किंवा क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याच पार्श्वभूमीवर संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी आणि मतदारांशी सतत संपर्क ठेवण्यासाठी महायुतीने नगरसेवकांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे गोकुळ गीते यांच्या माघारीनंतरही महायुतीने सावध पवित्रा कायम ठेवला असून नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालापर्यंत राजकीय हालचाली सुरूच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sunil Kedar: ‘असली खेल अभी बाकी है’, भाजपच्या एकतर्फी विजयाच्या दाव्याला सुनील केदारांचे जाहीर आव्हान

भिवंडीतील रिसॉर्टमध्ये नगरसेवकांच्या मुक्कामामुळे नाशिक विधान परिषद निवडणूक पुन्हा राज्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली असून मतदानाच्या दिवशी नेमकी कोणती राजकीय समीकरणे घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!