व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ubt matoshree meeting : मातोश्रीवरील बैठकीत सर्व ९ खासदार सहभागी !

Ubt matoshree meeting : मातोश्रीवरील बैठकीत सर्व ९ खासदार सहभागी !

shivsena-ubt-matoshree-meeting-all-nine-mps-attended-sanjay-raut-reveals-inside-story : फुटीच्या चर्चांवर पडदा टाकत संजय राऊतांनी सांगितली ‘इनसाईड स्टोरी’

Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना उत्तर देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत पक्षाचे सर्व नऊ खासदार सहभागी झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला असून, पक्षात कोणतीही नाराजी किंवा फूट नसल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या खासदारांमध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे यांचा समावेश होता. तर उर्वरित पाच खासदारांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदविला. काही खासदार वैयक्तिक, कौटुंबिक आणि स्थानिक राजकीय कारणांमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

Rohit pawar strike : शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवारांचा आक्रमक एल्गार

मराठवाडा आणि विदर्भातील खासदारांच्या अनुपस्थितीबाबत निर्माण झालेल्या चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे त्यांच्या मुलाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सहभागी झाले. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख हे मुलीच्या विवाहसोहळ्यामुळे ऑनलाइन उपस्थित होते. तर ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे कौटुंबिक आणि वैद्यकीय कारणांमुळे प्रत्यक्ष बैठकीला येऊ शकले नाहीत.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी पक्षातील सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून एकजूट असल्याचे सांगितले. जे खासदार प्रत्यक्ष बैठकीसाठी येऊ शकले नाहीत, ते पुढील दोन ते तीन दिवसांत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणावर भर दिला. राज्यातील शेतकरी, महागाई, कर्जमाफी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे आवाज उठवण्याच्या सूचना खासदारांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कर्जमाफीसंदर्भात सरकारला प्रश्न विचारण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे समजते.

याशिवाय, पक्षातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या अफवांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधावा आणि आपण पक्षासोबतच असल्याचा स्पष्ट संदेश द्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आज खासदारांची बैठक घेतल्यानंतर जिल्हाप्रमुखांशीही ऑनलाइन संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हानिहाय संघटनात्मक परिस्थिती, स्थानिक प्रश्न आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुखांशी थेट चर्चा करणार आहेत.

Sunil Kedar: ‘असली खेल अभी बाकी है’, भाजपच्या एकतर्फी विजयाच्या दाव्याला सुनील केदारांचे जाहीर आव्हान

दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केले आहे. आमदार कैलास पाटील यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट करत, २०२२ मध्येच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला. “आमचे संपूर्ण संसदीय दल एकजूट आहे. आम्ही घाबरणारे नाही. ऑपरेशन टायगरची भाषा करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, आम्हीच ऑपरेशन करणार आहोत. ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन लांडगा करू,” असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या दाव्यांना प्रत्युत्तर दिले.

White line controversy : जैन धर्मगुरू, स्थानिक महिलेत चकमक, मनसे आक्रमक महापालिकेची कारवाई !

मातोश्रीवरील या बैठकीनंतर ठाकरे गटाने पक्षातील फूट आणि खासदारांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असून, आगामी काळात संघटनात्मक पातळीवर अधिक सक्रिय होण्याचे संकेतही या बैठकीतून मिळाले आहेत.

error: Content is protected !!